अहमदनगर : जिल्ह्यातील सरपंचपदाच्या निवडी ९ आणि १० फेब्रुवारीला होणार आहेत. दोन्ही दिवशी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ७५८ गावांमध्ये ही निवड प्रक्रिया होणार आहे. प्रत्येक तालुक्यात पहिल्या दिवशी निम्म्या व दुसऱ्या दिवशी निम्म्या गावांचे सरपंच निवडले जाणार आहेत. यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. दरम्यान जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या सरपंचपदाच्या निवडी अखेर पार पडणार आहेत.
जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यामध्ये ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर ९ ठिकाणच्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक न झाल्याने तेथील पदे रिक्त आहेत. त्यामुळे ७५८ गावांतील कारभाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. तहसीलदारांच्या आधिपत्याखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. १५ जानेवारीला मतदान झाले, १८ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला. २७ आणि २८ जानेवारीला सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार निकाल लागल्यानंतर एक महिन्याच्या आत सरपंचपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम पार पाडण्यात यावा, असा आदेश आहे. त्यानुसार १५ फेब्रुवारीच्या आत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला. त्यानुसार ९ आणि १० फेब्रुवारीला निवड प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील यांनी दिली.
----------------
अपूर्ण