लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील दि. ९ व १० फेब्रुवारीला सरपंच, उपसरपंच पदासाठी निवड होणार आहे. सरपंच पदाचे उमेदवार बहुतेक ठिकाणी निश्चित झाले आहेत. मात्र उपसरपंचपदासाठी अनेक जण पुढे आले आहेत. त्यामुळे सदस्यांचा घोडेबाजार तेजीत आणि पळापळ जोरात सुरु झाली आहे. अनेक सदस्य सहलीवर गेले आहेत. त्यामुळे निवडीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
५९ ग्रामपंचायतीची निवडणूक झाली आहे. येळपणे, लिंपणगाव, हिंगणी, शेडगाव, कौठा, हंगेवाडी, उक्कडगाव वगळता बहुतेक ठिकाणी बहुमताचा कौल दिला आहे. यांचे गंभीर परिणाम सरपंच, उपसरपंच निवडीवर दिसून येत आहेत.
आढळगावात उत्तमराव राऊत, शरद जमदाडे, अनिल ठवाळ यांना त्रिशंकू कौल दिला. त्यामुळे सरपंच व उपसरपंचपदाच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी काही सदस्यांनी बंडाचे निशाण हाती घेतले आहे. त्यामुळे आढळगावमध्ये उपसरपंचपदाच्या खेळीत जो यशस्वी होईल त्या गटाचा झेंडा ग्रामपंचायतीवर फडकणार आहे. शेडगावमध्ये विजयराव शेंडे यांच्या गटाला स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे सरपंचपदी संध्या शेंडे यांची निवड निश्चित आहे. पण उपसरपंचपदासाठी कुणाची वर्णी लागणार यावर उत्सुकता आहे. गव्हाणेवाडीत आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप गटाला सन्मान चार चार जागा मिळाल्या आहेत. बिनविरोध निवडून आलेल्या सदस्याच्या हाती सत्तेची चावी आहे. कौठामध्ये शाहुराजे शिपलकर सरपंच, उपसरपंच निवडीत काय निर्णय घेतात यावर सरपंच व उपसरपंच पदाची माळ गळ्यात पडणार आहे. अजनुजमध्ये नागवडे गटाला सहा तर पाचपुते गटाला पाच जागा तर विशाल कवडे व गीता गिरमकर हे अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. गीता गिरमकर यांची सरपंचपदी निवड निश्चित आहे. मात्र सत्ता कुणाला द्यायची? याची चावी विशाल कवडे यांच्या हाती आहे. घोटवी, सुरेगावमध्ये सरपंच आरक्षण खेळात बहुमत मिळालेल्या गटाला विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. वडाळी, आर्वी, बाबुर्डीत सरपंच आरक्षणाचा तिढा निर्माण झाला आहे.
वांगदरीच्या सरपंच पदासाठी आदेश नागवडे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे सरपंच उपसरपंच पदाची भाकर कशी फिरवतात हे महत्त्वाचे आहे. येळपणेच्या सरपंचपदी किरण धावडे यांची निवड निश्चित आहे. मात्र सतीश धावडे व नवनाथ देवकर हे उपसरपंचपदासाठी कुणाला संधी देतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.
...
अनेकांना उपसरपंचपदाचे आमिष
ज्या ठिकाणी काठावरचे बहुमत आहे त्या गावात दोन्ही गटांनी उपसरपंच पदाचे गाजर दाखविले आहे. त्यामुळे अनेक सदस्यांनी अंगात आणल या..! मला उपसरपंच नाही केले तर मी विरोधी गटाकडे निघालो अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे गटप्रमुख हतबल झाले आहेत.