लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: स्वच्छ भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर प्रकल्प अधिकाऱ्यांनी शहरातील विविध भागांची पाहणी करीत बुधवारी आढावा घेतला. यावेळी काही सूचनाही करण्यात आल्या असून, त्याची अंमलबजावणी स्वच्छता विभागाकडून करण्यात येत आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने चालू वर्षी फाइव्ह स्टार मानांकनासाठी नोंदणी केली आहे. महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून केलेल्या उपाययोजनांची केंद्रीय पथकाकडून पाहणी केली जाणार आहे. ही समिती पाहणी करण्यासाठी येणार असल्याने पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या प्रकल्प अधिकारी हर्षा नारखडे मंगळवारी नगरमध्ये दाखल झाल्या. त्यांनी बुधवारी शहरातील सावेडी उपनगरातील प्रोफेसर चौक, भाजी मार्केट, बुरुडगाव येथील कचरा डेपो, आदी २१ ठिकाणांना भेट दिल्या. यावेळी शहरातील स्वच्छतेबाबत मुख्य स्वच्छता निरीक्षक किरण देशमुख यांनी माहिती दिली. यावेळी प्रकल्प अधिकारी राहुल अहिरे, राजेंद्र सामल, लक्ष्मण लांडगे आदी उपस्थित होते.