संगमनेर : शहर झपाट्याने वाढत असून अनेक विकास कामे झाली आहेत. आता संगमनेरच्या वैभवात भर टाकणाऱ्या आधुनिक व हायटेक बसस्थानकाची निर्मिती होणार असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. नव्याने बांधण्यात येणाऱ्या एस. टी. बसस्थानकाचे भूमिपूजन थोरात यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे, बाजीराव खेमनर, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, आर. बी. रहाणे, उपसभापती बाळासाहेब गायकवाड, उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार, दिलीप पुंड आदी उपस्थित होते. थोरात म्हणाले, शहरात विकासात्मक कामातून अनेक वैभवशाली इमारती उभ्या राहिल्या. एस. टी. महामंडळ व विद्युत महामंडळ ही सामान्यांच्या जिव्हाळ्याची आहेत. पुढील ५० वर्षांचे नियोजन करून नवीन बसस्थानकाची निर्मिती केली जाणार आहे. आगामी काळात नवीन पोलीस वसाहत व पोलीस ठाण्याची कामे होतील.कतारवस्ती व वडारवस्तीसाठी घरकुले बांधून दिली जातील. गोरे म्हणाले, एस.टी. ने कायम जनतेची सेवा केली. प्रवाशांना सुरक्षिततेची हमी दिली. एस. टी. महामंडळ उर्जितावस्थेत आले आहे. नवीन बदलांच्या स्वीकारासह राज्यातील सर्व बसस्थानक व सुविधा आधुनिक केल्या जाणार असल्याचे गोरे यांनी सांगितले. तांबे, जयवंत पवार, डी. बी. खुळे यांची भाषणे झाली. याप्रसंगी बाबा ओहोळ, विश्वास मुर्तडक, अनिल देशमुख, शिवाजी थोरात, अर्चना बालोडे, मिरा चकोर, शकील शेख, नितीन अभंग, गणेश मादास, अजय फटांगरे, मिलिंद कानवडे, सुरेश थोरात, बाळकृष्ण कर्पे, अरूण वाकचौरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रादेशिक व्यवस्थापक गुलाबराव पाटील यांनी केले. सूत्रसंचालन साजीद पठाण व नामदेव कहांडळ यांनी करून विभाग नियंत्रक संवत्सरकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
संगमनेरला ‘हायटेक’ बसस्थानक
By admin | Updated: August 19, 2014 02:15 IST