संदीप कोतकर अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 22:32 IST
अहमदनगर : काँग्रेसचा विद्यमान नगरसेवक, माजी महापौर व सध्या खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला संदीप भानुदास कोतकर याचे नगरसेवक पद आयुक्तांनी रद्द करावे, असा अभिप्राय जिल्हा न्यायालयातील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश चांदगुडे यांनी शुक्रवारी (दि.८) दिला.
संदीप कोतकर अपात्र
अहमदनगर : काँग्रेसचा विद्यमान नगरसेवक, माजी महापौर व सध्या खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला संदीप भानुदास कोतकर याचे नगरसेवक पद आयुक्तांनी रद्द करावे, असा अभिप्राय जिल्हा न्यायालयातील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश चांदगुडे यांनी शुक्रवारी (दि.८) दिला. संदीप कोतकर हा सध्या कॉँग्रेसचा नगरसेवक असून माजी महापौर आहे. खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाल्याने कोतकरच्या अपात्रतेबाबत काय निर्णय घेतला, अशी विचारणा तत्कालीन विरोधी पक्षनेते संजय शेंडगे यांनी प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार नगरसचिव कार्यालयाने विधीतज्ज्ञांचे मत घ्यावे, असा अभिप्राय आयुक्तांना दिला होता. त्यानुसार आयुक्तांनी तत्कालीन विधीज्ञ प्रसन्ना जोशी आणि अनिता दिघे यांचे मत घेतले. महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ चे कलम १०,११,१२,१३, तसेच कलम ४०५ मधील तरतुदींचा अभ्यास करून त्यांनी अभिप्राय दिला होता. महापालिकेने विनंती केल्यास हा विषय आयुक्त न्यायाधीशांकडे पाठवतील. न्यायाधीश निर्णय देत नाहीत, तोपर्यंत तो सदस्य अनर्ह झाला असे मानले जाणार नाही, अशी तरतूद कायद्यात आहे. कलम १३ नुसार गैरवर्तणुकीबद्दल किंवा अशोभनीय गोष्टी बद्दल दोषी ठरलेल्या सदस्यास राज्य शासनाचे स्वत:हून किंवा महापालिकेच्या शिफारशीवरून त्या व्यक्तीला सदस्यपदावरून दूर करता येते, असा अभिप्राय विधीज्ज्ञांनी दिला होता. सदरचा अभिप्राय महासभेत दिला होता. महासभेने कोतकर याच्या अपात्रतेबाबतचा निर्णय घेण्यासाठी सदरचे प्रकरण जिल्हा न्यायालयाकडे पाठविले होते. जिल्हा न्यायालयाने याबाबत शुक्रवारी (दि. ८) अभिप्राय दिला. यामध्ये कोतकर याला अपात्र ठरवावे, असा स्पष्ट अभिप्राय दिला. महापालिकेच्यावतीने अॅड. तुळशीराम बाबर यांनी काम पाहिले. कोतकर याच्यावतीनेही न्यायालयात युक्तीवाद करण्यात आला होता. आता सदरचा अभिप्राय आयुक्तांना मिळाल्यानंतर त्यावर कार्यवाही होणार आहे. अपात्रतेचे सर्व नियम, अटी या कारवाईच्यावेळी लागू होणार आहेत.