ग्रामस्थांनी पकडलेला वाळूचा ट्रक तस्करांनी दमदाटी करत ताब्यात घेतला. यावेळी त्यांचा ग्रामस्थांशी वाद झाला. तलाठी नंदकुमार नागापुरे यांना मारहाण करण्यात आली. यामुळे ग्रामस्थ व महसूल कर्मचारी भयभीत झाले आहेत. तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक संजय सानप, निरीक्षक मसूद खान यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली.
तलाठी नागापुरे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक (एमएच ०४, एस २९५५) तसेच इतर सात जणांवर सरकारी कामात अडथळा आणणे तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळूने भरलेल्या दोन ट्रकला थांबविले असता आरोपींनी येऊन शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने एक ट्रक ताब्यात घेतला आहे. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. वाळू तस्करांच्या या हल्ल्यामुळे या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्याकडे प्रस्ताव देणार असल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.
-----------
तपासणी केंद्राचे काय?
काही दिवसापूर्वी महसूल विभागाने नदीपात्राजवळ तपासणी केंद्र सुरू केले होते. रात्रीची गस्तही सुरू केली, मात्र तरीही तस्करांचा धुडगूस थांबलेला नाही. त्यामुळे या कारवाईचा कोणताही लाभ झालेला नाही असे दिसते.
---------