अहमदनगर : पावणेदोनशे वर्षांची परंपरा असलेली पद्मशाली जातपंचायतची प्रथा अखेर संपुष्टात आली आहे. पद्मशाली न्याय कमिटी बरखास्त करण्यात येत असल्याची माहिती पंचकमिटी पद्मशाली ज्ञाती समाजाचे अध्यक्ष प्रकाश येनगंदूल व पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महासंघाचे माजी अध्यक्ष अंबादास चिट्याल यांनी दिली.पद्मशाली समाजातील तरुण कार्यकर्ते प्रा. विठ्ठल बुलबुले, प्रकाश कोटा, अजय लयचेट्टी यांनी पंचकमिटीकडे पत्र देऊन न्याय समिती बरखास्त करण्याची मागणी केली होती. त्यावर खुली चर्चा होऊन बरखास्तीचा निर्णय झाला. समाजातील विवाहितांच्या घटस्फोटांच्या प्रकरणात निकाल देणे, घरगुती वाद व संपत्ती वाटपाच्या भांडणात तोडगा काढणे आदी न्यायनिवाडे ही समिती करत होती. मात्र काही वादग्रस्त निर्णयाविरोधात समाजातील तरुणांनी न्याय समितीविरुद्ध लढा सुरू केलाहोता. यासंदर्भात समाजाच्या शिखर संघटनेकडे तक्रार करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पंचकमिटी पद्मशाली ज्ञाती समाज संघटनेची बैठक येथील मार्कंडेय मंदिरात झाली. चर्चेनंतर सर्वानुमते न्याय समिती बरखास्त करण्यात आली. समाजातील वाद मिटविण्यासाठी एक संवाद केंद्र असावे. त्यालाही लिखित नियमावली असावी, असेही बैठकीत ठरले.अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जातपंचायत मूठमाती अभियानाचे संयोजक कृष्णा चांदगुडे यांनी निर्णयाचे स्वागत केले आहे. (प्रतिनिधी)समाजातील जातपंचायत बरखास्त करण्याचा निर्णय घेऊन पद्मशाली समाजाने पुरोगामी विचार जपला आहे. समाजातील सर्व ज्येष्ठांनी व ज्ञाती समाजाने तरुणांच्या मागणीला दिलेला प्रतिसाद स्वागतार्ह आहे. मात्र अजूनही अनेक प्रथा, परंपरा बदलण्याची गरज आहे. संघटनेच्या सभासदांत ‘अ’ व ‘ब’ वर्ग वर्गीकरण रद्द करून समानता आणण्याची गरज आहे. - विठ्ठल बुलबुलेसामाजिक कार्यकर्ते
पद्मशाली समाजाची जात पंचायत बरखास्त
By admin | Updated: July 31, 2014 00:41 IST