अहमदनगर: प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेने विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोनलाची दखल घेऊन प्रश्न सोडविले नाहीतर ५ आॅगस्टला पुन्हा धरणे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. राज्यातील तोट्यातील एस.टी.डेपो बंद करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करावा, खासगीपूरक प्रवासी वाहतुकीचा प्रस्ताव रद्द करावा, अवैध खासगी प्रवासी वाहतुकीवर न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे नियंत्रण आणावे, शासनाने मंडळास देय असलेले १३४० कोटी रुपये रोख स्वरुपात द्यावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. राज्य एस.टी.कर्मचारी संघटनेचे सचिव हनुमंत ताठे व अध्यक्ष शिवाजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात आले. नगरमधील सर्जेपुरातील विभागीय कार्यालयासमोर विभागीय सचिव डी.जी.अकोलकर, अध्यक्ष शिवाजी कडूस यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. महिला अध्यक्ष रजनी साळवी, विभागीय कार्याध्यक्ष रणसिंग, गटणे, दळवी, आडसूळ या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या आंदोलनाने प्रश्न सुटले नाही तर ५ आॅगस्ट रोजी विभागीय व मध्यवर्ती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. त्यानंतरही प्रश्न सुटले नाहीतर १२ आॅगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर राज्यातील कर्मचारी धरणे आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला. प्रवासी जनतेच्या वाहतुकीवर कोणताही अडथळा न आणता हे आंदोलन केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कामगारांच्या उत्पन्न वाढीच्या विविध सूचनांचे संकलन करून आवश्यक त्या कार्यवाहीसाठी त्या प्रशासनाला सादर केल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)
एस. टी.कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
By admin | Updated: July 18, 2014 01:39 IST