शेवगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवगाव पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडीस मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे राष्ट्रवादीची व्होट बँक अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. त्यादृष्टीने सभापतीपदाकरिता कुणास संधी मिळणार? याबाबतच्या चर्चेस वेग आला आहे. सभापतीपदाकरिता रस्सीखेच अटळ आहे. जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीपदाच्या आरक्षणाच्या सोडतीमध्ये शेवगाव पंचायत समिती सभापतीपद हे सर्वसाधारण महिला सदस्यांकरीता आरक्षीत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. पंचायत समितीचे सभापतीपद हे सध्या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सदस्यांकरिता राखीव आहे. दहिगावने पंचायत समिती गणाच्या सदस्या छाया बाळासाहेब धोंडे(सुलतानपूर मठाची वाडी) या पंचायत समितीच्या सभापतीपदावर सध्या विराजमान आहेत.पंचायत समितीवर घुले बंधुंची घट्ट पकड आहे. १० पैकी ८ सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. पंचायत समितीचे सभापतीपद हे महिला सदस्यांकरिता आरक्षीत असल्याने अरुण पाटील लांडे हे उपसभापती म्हणून कार्यरत आहेत. आता सभापतीपदाच्या नव्याने जाहीर झालेल्या आरक्षणाच्या सोडतीत शेवगाव पंचायत समितीचे सभापतीपद हे सर्वसाधारण महिला सदस्यांकरिता आरक्षीत जाहीर झाले आहे. पंचायत समितीत सत्ताधारी राष्ट्रवादीच्या चार विद्यमान महिला सदस्या कार्यरत आहेत. विद्यमान सभापती धोंडे यांना मुदतवाढ मिळणार की नवीन महिला सदस्यास संधी मिळणार? हा प्रमुख विषय आहे. चापडगाव गणाच्या सदस्या लता अशोक डाके या शेवगावच्या माजी सरपंच अशोकराव डाके यांच्या पत्नी आहेत. त्यांना संधी मिळण्याची चिन्हे आहेत.आखेगाव गणाच्या सदस्या मंगल माधव काटे या केदारेश्वरचे उपाध्यक्ष अॅड. प्रतापराव ढाकणे यांचे कट्टर समर्थक माधव काटे यांच्या पत्नी आहेत. त्यांना संधी देऊन ढाकणे गटाची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न अॅड.घुले करणार? याबाबतची ही चर्चा रंगली आहे. याशिवाय घोटण पंचायत समिती गणाच्या सदस्या ताराबाई ढोरकुले यांच्याही नावाची चर्चा आहे. एकंदरीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्व आले आहे. (प्रतिनिधी)
सभापतीपदासाठी रस्सीखेच
By admin | Updated: July 30, 2014 00:46 IST