लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : नगरविकास खात्याने रद्द केलेले नगरसेवक पद कायम ठेवण्यासाठी श्रीपाद छिंदम याने दाखल केलेल्या अर्जावर बुधवारी औरंगाबाद खंडपीठासमोर सुनावणी पूर्ण झाली. याबाबतचा निकाल न्यायालयाने राखीव ठेवला असून, या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
याप्रकरणी खंडपीठात न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. डी. आर. काळे यांनी तर महापालिकेच्या वतीने व्ही.डी. होन व किशोर लाेखंडे यांनी बाजू मांडली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची छिंदम याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यावेळी याप्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले होते. याच विषयावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत छिंदम याचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव करण्यात आला होता. हा ठराव नगरविकास खात्याला सादर करण्यात आला. याबाबत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सुनावणी होऊन छिंदम याचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले. तसा नगरविकास विभागाचा आदेश महापालिकेला प्राप्त झाला आहे. या आदेशानंतर महापालिकेच्या नगर सचिव विभागाने नगर शहरातील प्रभाग क्रमांक क ची पोटनिवडणूक घेण्याबातचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठिवला होता. दरम्यान, छिंदम याने नगरविकास खात्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते.