अहमदनगर : सावेडी उपनगरातील रस्त्यांच्या बाजूने रिलायन्स जिओ कंपनीला भूमिगत केबल व खांब उभे करण्यास मनपाकडून परवानगी दिली गेली. मात्र या कंपनीने नियम धाब्यावर बसवून थेट रस्त्यातच खांब उभे केले. याशिवाय परवानगीपेक्षा जास्त खांब उभे केल्याचा पालिकेला संशय आहे. त्यामुळे रिलायन्स जिओचे खांब वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान महामंडळाने शहरात रिलायन्स जिओ कंपनीचे खांब उभे करण्यासाठी महापालिकेकडे परवानगी मागवली होती. महापालिकेने रस्ते खोदाई शुल्क २ कोटी ६ लाख २० हजार,तर प्रति खांब पुनर्भरण शुल्क १ कोटी २० लाख, असे ३ कोटी ३६ लाख रुपये भरून घेतले व खांब उभे करण्यास परवानगी दिली. ही परवानगी देताना मार्ग निश्चित होणे अपेक्षित होते. मात्र मार्ग निश्चित न करता ठेकेदाराने रस्ते खाेदून पांढऱ्या रंगाचे गोल खांब उभे केले. महापालिकेचे उपअभियंते, प्रभाग अधिकारी, अतिक्रमण आणि वसुली विभागाचे अधिकारी व कर्मचारी कामानिमित्त रस्त्यावरून फिरत असतात. असे असताना खांब रस्त्यात उभे केले. बहुतांश मार्गावरचे कामही पूर्ण झाले. काम पूर्ण झाल्यानंतर खांब रस्त्यात उभे केल्याबाबतची नोटीस महापालिकेने संबंधितांना बजावली आहे. सावेडी उपनगरात हे खांब उभे करण्यात आले आहेत. एकविरा चौक, गुलमोहर रोड, बालिकाश्रम रोड, कुष्ठधाम रोड आदी रस्त्यातच हे खांब ठेकेदाराने उभे केले आहे. कंपनी बाहेरची असली तरी ठेकेदार मात्र स्थानिक आहे. असे असताना खांब उभे करून अतिक्रमण करण्यात आले असून, काम पूर्ण होईपर्यंत महापालिकेचे अधिकारी नेमकं काय करत होते, असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
....
खांब रस्त्यातच उभा करण्याची परवानगी दिली कुणी
रिलायन्स जिओ कंपनीकडून शहरी व ग्रामीण भागातील मोबाईल सेवा पुरविण्यासाठी खांब उभे करून त्यावर केबल टाकण्यात आली. त्यासाठी महापालिकेचे रस्ते खोदण्यात आले असून, हे काम नियमबाह्य करण्यात आले आहे. त्यामुळे हे काम थांबविण्यात आले असून, हे खांब वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
....
कंपनीने १२ हजार खांब उभारले
रिलायन्य जिओ कंपनीने सावेडी उपनगरात १२ हजार खांब उभारलेले आहेत. हे काम उभे करताना नगररचना विभागाची परवानगी घेतली गेली नाही. अनेक खांब रस्त्यात आलेले दिसतात. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाच्या वेळी हे खांब अडवे येणार असून, यामुळे रस्त्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
...
रिलायन्स जिओ कंपनीला सावेडी उपनगरात खांब उभे करण्यासाठी परवानगी दिली होती. परंतु, या कंपनीने रस्त्यात खांब उभे केले असून, संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे.
-एम.एस. पारखी, उपअभियंता, सावेडी विभाग
..
सूचना फोटो आहे.