अहमदनगर : रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी बाळ बोठे यास हैदराबाद येथून अटक केल्यानंतर पारनेर न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. या कोठडीची मुदत संपल्यानंतर आज बोठे यास पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी तपासासाठी पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने २३ मार्चपर्यत पोलिस कोठडीची वाढ केली. आरोपी बाळ बोठेचा आयफोन अजून उघडलेला नाही. हत्येचे कारण समोर आलेले नाही, त्यामुळे आरोपीला आठ दिवसांची पोलिस कोठडी वाढवून मिळावी, अशी सरकारी पक्षाच्या वतीने मागणी करण्यात आली होती. सरकारी पक्षाच्यावतीने अँड. मनीषा डुबे पाटील यांनी युक्तिवाद केला तर आरोपी पक्षाच्यावतीने अँड. महेश नवले यांनी युक्तिवाद केला. शनिवारी (दि.१३ मार्च) बाळ बोठे याच्यासह अन्य आरोपींना पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली होती. बाळ बोठे हत्याकांडानंतर फरार होता.
रेखा जरे हत्याकांड प्रकरण : बाळ बोठेच्या पोलिस कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 17:36 IST