संगमनेर : आधुनिक शिक्षण प्रणाली व गुणवत्ता यामुळे देशपातळीवर अग्रगण्य ठरलेल्या अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला देहरादून येथील इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अंतर्गत इस्रो इरीस नोडल सेंटरची मान्यता मिळाली आहे, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश यांनी सांगितले.
देहरादून येथील इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग या संस्थेच्यावतीने हा उपक्रम राबविला जात आहे. त्यानुसार इस्रोने २००४मध्ये ईडीयुसॅट हे कम्युनिकेशन सॅटेलाईट लॉन्च केले आहे. त्यातून शिक्षणाचा प्रचार-प्रसार करण्यात येत आहे. शैक्षणिक ग्रामीण रिसर्च सेंटर, मोबाईल, सॅटेलाईट सर्व्हिसेस, टीव्ही, ब्रॉडकास्टिंग फाॅर फार्मर्स ऑफ अग्रिकल्चर ॲण्ड हाऊसचे प्रादेशिक भाषेतही प्रोग्राम घेण्यात येणार आहेत.
इस्रो या संस्थेकडून विविध स्तरावर प्रगतीसाठी नोडल सेंटर देऊन शैक्षणिक प्रगतीसाठी मदत केली जात आहे. यासाठी अमृतवाहिनी संस्थेला हा मान मिळाला आहे. या अंतर्गत लाईव्ह इंटरॅक्टिव क्लासरूम, सेशन ई-लर्निंग, बेस्ट ऑनलाईन कोर्सेस प्रोग्राम, प्रॅक्टिकल आधारित नवनवीन संशोधन असे विविध उपक्रम घेतले जाणार आहेत.