पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीत (ता. पारनेर) बिनविरोध निवडणुकीस सुरुंग लागत ७ जागांसाठी १७ उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत. तर दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
आ. निलेश लंके यांनी पारनेर मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पुढाकार घेत प्रथम ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीत बैठका घेऊन बिनविरोधची हाक दिली. हजारे यांनी बिनविरोध निवडीच्या प्रस्तावाचे कौतुक केले. मात्र, राळेगणसिद्धीमध्येच बिनविरोध निवडीस सुरुंग लागला आहे.
बिनविरोध निवडीमध्ये गावात फक्त माजी सरपंच जयसिंग मापारी, सुरेश पठारे, लाभेश औटी यांच्याच मर्जीप्रमाणे उमेदवार घेऊन गाव स्वतः च्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी विजय पोटे, किसन पठारे यांनी उमेदवार उभे केल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, माजी सरपंच राष्ट्रवादीचे जयसिंग मापारी यांच्या गटाचे अनिल मापारी, स्नेहल फटागडे हे बिनविरोध निवडून आले.
----
मापारी-पठारे एकत्र..
राळेगणसिद्धीत माजी सरपंच जयसिंग मापारी, अनिल मापारी, दत्ता आवारी यांनी आ. निलेश लंके यांच्या सूचनेनुसार विरोधी गटाचे सुरेश पठारे, लाभेश औटी यांच्याबरोबर युती करीत बिनविरोधच्या निवडीत अडसर ठरणाऱ्यांच्या विरोधात एकत्र झाले आहेत. मात्र, जयसिंग मापारी, लाभेश औटी यांच्याच विरोधात उमेदवार उभे राहिले आहेत.