जामखेड : ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन महसूल व पोलीस प्रशासनाने शहरातील वेल्डिंग दुकाने, बर्फ फॅक्टरी या ठिकाणी छापे टाकून सर्व खाजगी वापरातील ५० ऑक्सिजन सिलिंडर ताब्यात घेतले. यातील ९ ऑक्सिजन सिलिंडर डॉ. आरोळे हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी देण्यात आले.
शहर व तालुक्यात ऑक्सिजनची कमतरता आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, व्यवसाय बंद आहेत. ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा व रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पाच केंद्रांना खाजगी व्यावसायिकांना ऑक्सिजन पुरवठा बंद केला असून, फक्त कोविड रुग्णांना ऑक्सिजन बंधनकारक केले आहे. जामखेड शहरात ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा जाणवत असल्याने तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ३५ ठिकाणी असलेल्या वेल्डिंग दुकाने, बर्फ फॅक्टरी या ठिकाणी छापे टाकले. तेथे सर्रास ऑक्सिजन सिलिंडरचा वापर होत असल्याचे दिसून आले. यामुळे या पथकाने ५० ऑक्सिजन सिलिंडर ताब्यात घेतले. यातील ९ भरलेले सिलिंडर तातडीने डॉ. आरोळे कोविड हॉस्पिटलला देण्यात आले व रुग्णांची गरज भागविली. अनावश्यक ऑक्सिजन सिलिंडर वापरणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्याचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी सांगितले.