बोधेगाव : कृषी विभागाने शेवगाव तालुक्यात केलेल्या जलयुक्त शिवारसह विविध योजनेतून बंधारे, बांधबंदिस्ती, शेततळे, गाळ काढणे,बांधबंदिस्तीसह विविध जलसंधारण कामांमधील गैरप्रकार, घोटाळ्यांची राज्य विधिमंडळाने दखल घेतली आहे. आमदार विनायक मेटे यांनी विधान परिषदेत यावर प्रश्न उपस्थित केला़ त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील व शेवगाव तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.‘लोकमत’ने शेवगाव तालुक्यातील ‘जलयुक्त शिवार’योजनेतील गैरप्रकारांवर प्रकाशझोत टाकणारी वृत्तमालिका जुलै महिन्यात प्रसिद्ध केली.तिची आमदार मेटे यांनी दखल घेत याबाबत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अर्धा तास चर्चा उपस्थित केली आहे. विधान परिषदेत नियम ९२ (२) (अ) अन्वये ही या विषयावर चर्चा होणार आहे. शेवगाव तालुक्यात कृषी विभागामार्फत जलयुक्त शिवार योजना व एकात्मिक पाणलोटक्षेत्र, आदर्श सांसद गाव, कोरडवाहू व गतिमान पाणलोट आदि विविध योजनेतून जलसंधारणाचे सतरा सिमेंट बंधारे, हजारो हेक्टर क्षेत्रावर बांध बंदिस्ती, समतल चर, तलावातील गाळ काढणे, नालाबांध दुरुस्ती, खोलीकरण, आदी कोट्यवधी रुपयांची कामे २०१३ पासून तालुक्यात राबविण्यात आली़ ‘लोकमत’ने या कामांमधील फोलपणा उघडकीस आणला़ त्याची दखल घेऊन प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी श्रीरामपूरचे उपविभागीय कृषी अधिकारी गोरक्षनाथ लोखंडे यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. (वार्ताहर)
‘जलयुक्त’ घोटाळ्यावर विधान परिषदेत प्रश्न
By admin | Updated: August 5, 2016 23:43 IST