पाथर्डी : येळी गावातील सुमारे दोनशे मजुरांचे रोजगार हमी योजनेचे पैसे मिळावेत, या मागणीसाठी मंगळवारी सकाळी पंचायत समितीचे उपसभापती संभाजी पालवे व येळीचे माजी सरपंच संजय बडे यांच्या नेतृत्वाखाली मजुरांनी मुंबई येथे पालकमंत्री मधुकरराव पिचड यांच्या शासकीय निवासस्थानी निदर्शने केली. पालकमंत्री पिचड यांनी निदर्शकांशी चर्चा करून मजुरांचे पैसे दोन दिवसात अदा केले जातील, असे आश्वासन दिले. याबाबत अधिक माहिती अशी की, येळी गावात पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या वतीने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून तीन रस्त्याची कामे २०१२ साली करण्यात आली. या कामावर सुमारे दोनशे मजूर होते. कामाबाबत तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार या कामाची चौकशी करण्यात आली होती. अधिकारी बाजीराव बोर्डे व तत्कालीन प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी दीपा मुधोळ यांनी येळी गावात येऊन ग्रामसभा घेतली. यावेळी मजुरांनी आम्ही काम केले असून त्याची मजुरी मिळावी, अशी मागणी केली. पिचड यांनी निदर्शकांशी यावेळी चर्चा केली. त्यानंतर जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना दूरध्वनी करून रोजगार हमी योजनेच्या कामाची चौकशी झाली असतानाही मजुरीचे पैसे का दिले नाही याची विचारणा केली. दोन दिवसात मजुरीचे पैसे द्या व तसे मला कळवावे, असे आदेश दिले. (तालुका प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
By admin | Updated: August 19, 2014 23:27 IST