लोकमत न्यूज नेटवर्क
तिसगाव : पाथर्डी तालुक्याच्या शिरापुरात एका तरुण उमेदवाराने ग्रामपंचायत निवडणुकीत आपला वचननामा (जाहीरनामा) स्टॅम्प पेपरवर दिला आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागातील श्री क्षेत्र मढी, हनुमान टाकळी, शिरापूर, घाटशिरस, कामत शिंगवे, पारेवाडी, कासारपिंपळगाव, चितळी, कोपरे गावात कौटुंबीक नात्यातील लढाई रंगतदार वळण घेत आहे. सासू विरूद्ध सूनबाई, दोन सख्या बहिणी, दोन जाऊबाई, चुलते - पुतणे, सख्खे मेहुणे अशा नात्यातील लढाई कौटुंबीक दुराव्यात भर घालणारी ठरत आहे. मतदारांची इकडे आड तिकडे विहीर अशी संभ्रमावस्था झाली आहे.
कामत शिंगवेत सुवर्णा सतीश कराळे व रोहिणी पोपटराव कराळे या दोन सख्ख्या बहिणी सर्वसाधारण महिला जागेसाठी वार्ड क्रमांक दोनमधून एकमेकींच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. वैशाली संजय पाटेकर व सरला राजेंद्र पाटेकर या दोन्ही जाऊबाईत वार्ड क्रमांक तीनमध्ये होणारी लढत लक्षवेधी ठरत आहे. वार्ड क्रमांक चारमधून महादेव लाला बर्डे व मुरलीधर यादव पिंपळे या दोन मेहुण्यांनी एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.
बाळू भानुदास कराळे व गौतम संपत कराळे या चुलत्या - पुतण्यातील लढत मतदारांची डोकेदुखी ठरत आहे. कासार पिंपळगाव येथे मंगल अर्जुन राजळे व मोनाली राहुल राजळे या चुलत सासू-सुना व माजी सरपंचांतील लढत विकासकामांच्या मुद्द्यांवर चर्चेची ठरली आहे. आदर्श गाव वाटचालीची दिशा निर्णायक वळणावर आहे.
शिरापूर येथे बाबासाहेब बुधवंत या तरुणाने गाव विकास व समस्यांच्या वचनपूर्तीचा आश्वासननामा स्टॅम्प पेपरवर दिला आहे. त्यामुळे निवडणुकीत रंग भरला आहे. चितळी येथे अशोकराव आमटे व कचरू आमटे या चुलत भावांतील लढतीने एक नंबर वार्ड प्रतिष्ठेचा बनला आहे.