कर्जत : कर्जत नगरपंचायतीने माझी वसुंधरा या स्पर्धेत राज्यस्तरावर दुसरा क्रमांक पटकाविला. यातील दोन कोटींची बक्षीस रक्कम नुकतीच प्राप्त झाली. या रकमेतून पर्यावरणपूरक शहर बनविण्यासाठीची कामे हाती घेतली जाणार आहेत.
नगरपंचायतीने माझी वसुंधरा अभियानामध्ये केलेल्या विविध कामांचे बक्षीस म्हणून राज्य शासनाकडून दोन कोटी रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले आहे. या बक्षीस रकमेच्या साहाय्याने शहरांमध्ये सात हरित उद्याने, सुसज्ज अशी रोपवाटिका, रस्त्याच्या दुतर्फा सौरदिवे, शहरामध्ये यापूर्वी लावलेल्या वृक्षांचे संवर्धन, जुने आड, बारव यांचे संवर्धन अशी कामे केली जाणार आहेत. नागरिकांनी माझी वसुंधरा अभियान दोनमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन कर्जत शहर स्वच्छ सुंदर व हरित करण्यासाठी पुन्हा एकदा हातभार लावण्याचे आवाहन नगरपंचायतीने केले आहे. माझी वसुंधरा अभियान एकमध्ये नगरपंचायतीने राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला. माझी वसुंधरा अभियान दोनमध्ये संपूर्ण नागरिकांच्या सहभागाने कर्जत राज्यात प्रथम क्रमांक मिळवेल, असा विश्वास मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी व्यक्त केला.
नाशिक येथे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मुख्याधिकारी गोविंद जाधव यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान केला.
----
११ कर्जत नगरपंचायत
कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांना नाशिक येथे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते बक्षीस प्रमाणपत्र देण्यात आले.