बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : राज्यातील तलाव व कालव्यातील पाणी शेती सिंचनासाठी खासगी अगर सहकारी संस्थांना लिलाव पध्दतीने देण्याचे धोरण सरकारने घेतले आहे. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर व कुकडीचा १३२ जोड कालव्याचे टेंडर काढण्याची प्रकिया सुरू झाली आहे.
राज्य शासनाने छोटे धरण, तलाव पाणीवाटपाचे नियोजन हे खासगी सहकारी संस्थांमार्फत करण्याचे परिपत्रक काढले आहे. हे परिपत्रक कृष्णा खोरे विकास महामंडळ, तापी खोरे, गोदावरी खोरे, विदर्भ आणि कोकण खोरे विकास महामंडळ यांना दिले आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाने खाजगी संस्थेमार्फत त्रैवार्षिक पध्दतीने नियोजन करण्यासाठी विसापूर व कुकडीचा १३२ जोड कालव्याची शिफारस केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपताच टेंडर काढण्याची प्रकिया सुरू होणार आहे. विसापूर तलाव व कुकडी कालव्याचे पाणीवाटपाचे तीन वर्षांसाठी टेंडर काढले जाणार आहे. लाभक्षेत्रातील सर्व सहकारी पाणीवापर संस्था टेंडर घेणाऱ्या एजन्सीला जोडल्या जाणार आहेत. खाजगी एजन्सी पाणीवापर संस्थांना पाणी देणार आहे. पाणीपट्टी सहकारी पाणीवापर संस्थांनी एजन्सीला देणे बंधनकारक राहणार आहे. खाजगी एजन्सी कालवा चाऱ्यांची देखभाल करणार आहे.
....
विसापूर तलावाचा प्रवास
हंगा नदीवर विसापूर तलाव इंग्रजांनी १८९६ ते १९२७ दरम्यान बांधला. निंबवी, विसापूर, पिंपळगाव पिसा, बेलवंडी, पारगाव, लोणीव्यंकनाथ, घारगाव, बेलवंडी, चिंभळे, मढेवडगाव, शिरसगाव बोडखा, पिसोरे या गावांतील १३ हजार १४३ एकर क्षेत्र ओलिताखाली आले. कुकडी प्रकल्प झाला. कुकडीचे १३२ जोड कालव्यावर विसापूरखालील सुमारे पाच एकर क्षेत्र हस्तांतर झाले.
....
पाण्याचा गैरवापर थांबणार
विसापूर तलाव व कुकडी जोड कालव्यावर असलेल्या सहकारी पाणीवापर संस्था व कृषी व ग्रामपंचायत उचल पाणीवापर संस्था मासेमारीवाले हे टेंडर घेणाऱ्या एजन्सीच्या अधिपत्याखाली घेणार आहेत. सर्वांकडून शासकीय नियमानुसार पाणीपट्टी वसूल केली जाईल. जास्त पाणीपट्टी कुणाकडून वसूल केली जाणार नाही. मात्र, आता सर्वांना पाण्याचे मोजमाप लावले जाणार आहे. त्यामुळे पाण्याचा गैरवापर थांबण्यास मोठी मदत होणार आहे, असा जलसंपदा विभागाने दावा केला आहे.
..
..