कोपरगाव : हवामान खात्याने राज्यात तीन दिवस विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार कोपरगाव शहरासह तालुक्यात शनिवारी (दि. २०) दुपारनंतर हवामानात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह दहा ते पंधरा मिनिटे पावसाच्या सरी बरसल्या.
या पावसाने शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील काढणी केलेली तसेच काढणीला आलेली हरभरा, ज्वारी, गहू पिके काही प्रमाणात भिजली. उघड्यावर व्यवसाय करणाऱ्या पथविक्रेत्यांची चांगलीच धावपळ झाली होती.
दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे समृद्धी महामार्गाच्या भरावासाठी वाहतूकप्रसंगी रस्त्यावर सांडलेल्या मातीचे चिखलात रूपांतर होऊन रस्त्यांची घसरगुंडी झाली होती. त्यामुळे दुचाकीस्वारांसह सर्वच वाहनधारकांना या रस्त्यावरून प्रवास करताना चांगलीच सर्कस करावी लागली.