खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डासह परिसरात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती आहे. रब्बी हंगामातील मुख्य पीक असलेल्या ज्वारीची कणसे या पावसाने भिजली आहेत.
खर्डा व परिसरात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने हजारो एकर शेतातील ज्वारी, गहू, हरभरा, आंबा पिकाचे अतोनात नुकसान झाले. पावसाने भिजल्यामुळे ज्वारी काळवंडून कडबा खराब झाल्यास चारा संकटास शेतकऱ्यांना सामोरे जाण्याची वेळ आली. ऐन काढणीच्या सुगीच्या हंगामात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीस सामोरे जाण्याची वेळ आली. महागडे बियाणे खर्च करून रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी ज्वारी पेरणी केली होती. दिघोळ, जातेगाव, गवळवाडी, गितेवाडी, मोहरी, सातेफळ, वंजारवाडी, तरडगाव, दरडवाडी, पांढरेवाडी, तेलंगशी, धामणगाव, नायगाव, देवदैठण आदी भागातही पावसाने पिकांचे नुकसान झाले.