अहमदनगर : मरीआईच्या नावानं चांगभलं म्हणत भिक्षा मागणाऱ्या पोतराजाने आता स्वत:च्या शरीराऐवजी परिस्थितीवरच कोरडा ओढला आहे. जिल्ह्यामध्ये मातंग समाजातील प्रत्येक घरामध्ये एक पोतराज होता. मात्र ही संख्या आता घटली आहे. जिल्ह्यात दोन ते अडीच हजार एवढेच पोतराज शिल्लक राहिले असल्याचा दावा केला जात आहे. हे पोतराजही वर्षभर इतर उद्योग-धंदे बघून आषाढ महिन्यापुरतेच पोतराज होत आहेत. शिक्षणामुळेच हे परिवर्तन घडून आले असून अंधश्रद्धेवरही मात केल्याने लक्ष्मीआईच्या जत्रांची संख्याही घटली आहे.एरव्ही मंगळवार आणि शुक्रवारी भिक्षा मागणारे पोतराज आषाढ महिन्यात रोज दिसू लागतात. पंढरीची वारी संपली की गावकुसाबाहेरच्या लक्ष्मीआईच्या जत्रा सुरू होतात. गळ््यात मण्यांच्या माळा, कंबरेला घुंगराची माळ, कोरड्याचे अंगाभोवती केले जाणारे सट...सट वार, पायात खुळखुळा, हिरव्या खणांचा घागरा, त्याला लावलेला लिंबाचा पाला, दाढी नाही, मात्र मिशा असलेला, केसांच्या जटा किंला अंबाडा, हातात डफडे आणि कपाळावर हळदी-कुंकवाचा मळवट भरलेला पोतराज खेडोपाडी आजही दिसतो. अंगावर कोरडे ओढत तो मरीआईच्या नावाने भिक्षा मागतो. आषाढ महिना म्हणजे पोतराजांच्या कमाईचे दिवस मानले जातात. ३० वर्षांपूर्वीची स्थिती पाहिली तर प्रत्येक घरामध्ये पोतराज दिसायचा. आता शिक्षणाचा प्रसार, नोकरी, उद्योगधंदे, मोडीत निघालेल्या बलुतेदारी पद्धतीमुळे पोतराजांची संख्या कमी झाली आहे.आषाढ महिना म्हणजे पाऊस येऊन गेलेला असायचा. रिमझिम पावसामुळे रोगराई वाढलेली असायची. अशा स्थितीत रोगराई पसरू नये, इडा-पिडा होऊ नये म्हणून गावाबाहेरच्या लक्ष्मीची आराधना केली जायची. बारागाड्या ओढल्या जायच्या. जत्रा व्हायच्या. कोंबड्या-बकऱ्यांचे बळी दिले जातात. मात्र अशा अंधश्रद्धांना आता मातंग समाजातील सुशिक्षितांनीच मूळमाती दिली आहे.(प्रतिनिधी)ब्रिटीशांच्या काळात म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात जातीनिहाय सर्व्हे झाला होता. त्यानंतर मातंग समाजाची वेगळी गणना झाली नाही. राज्यात मातंग समाजाची लोकसंख्या ७५ लाखांच्या आसपास आहे. मात्र ही संख्या २२ लाख एवढीच दाखविण्यात आली आहे. मातंग समाजासाठी स्वतंत्र आयोगाची स्थापना केली, मात्र त्याचा समाजाच्या उन्नतीसाठी फारसा उपयोग झालेला नाही. अंधश्रद्धेविरुद्ध कोरडे ओढल्याने पोतराजांची संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यात दोन ते अडीच हजार पोतराज आहेत. हा चांगला बदल आहे. मात्र कलावंत म्हणून त्यांचा शासन दरबारी सन्मान झाला पाहिजे. मातंग समाज अंधश्रद्धेपायी जत्रांसाठी लाखो रुपये खर्च करतो. तो पैसा शिक्षणासाठी कामी आला पाहिजे. - अनंत लोखंडे, कॉम्रेडपूर्वी मातंग समाजामध्ये प्रत्येक घरात पोतरात असायचा. आता शिक्षणामुळे समाज सुधारला आहे. जिल्ह्यात पूर्वीइतके पोतराज राहिले नाहीत. ही संख्या अत्यंत कमी आहे. मातंग समाजाची लोकसंख्या एक लाखाच्या घरात आहे. त्या तुलनेच पोतराजांची संख्या एक टक्काही नाही. हा बदल परिवर्तनवादी आहे. प्रथा, परंपरा या संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. अंधश्रद्धेला मूठमाती देऊन पोतराज जतन केला पाहिजे- श्रीकांत साठे, मांतग पंच कमिटीनगरची परंपरा... कोल्हापूरची महालक्ष्मी गायीच्या खुरातून नगरला आल्याची अख्यायिका सांगितली जाते. ही गाय आयुर्वेद महाविद्यालयाच्या चौकाजवळ विसावली. तिथेच काही दिवस महालक्ष्मीने मुक्काम केला. सुमारे दीडशे वर्षांपूर्वीची ही घटना घडल्याचे मातंग समाजातील जाणकार सांगतात. या लक्ष्मीला माळीवाडा येथे आणण्यात आले आणि तेथे मंदिर बांधले. तेंव्हापासून नगरची लक्ष्मीआई म्हणजे माळीवाड्यातील लक्ष्मीआई आहे. येथीलच पूजा मानाची समजली जाते. लक्ष्मीआईची पूजा करणारी चार घराणी असून त्यांचा दरवर्षी मान बदलला जातो.मातंग समाजात सध्या मरीआईच्या नावाने कोणी भिक्षा मागत नाही. शिक्षणामुळे पोतराज व्हायला कोणी तयार होत नाही. पोतराज असले तरी वर्षभर नोकरी, व्यवसाय, धंदे सांभाळून ते प्रथा सांभाळतात. जटाधारी पोतराज कमी झाले आहेत. आषाढ महिना आला की पोतराज नोकरी,धंद्याला पंधरा दिवसांची विश्रांती देऊन जत्रा करतात.
पोतराजांचा परिस्थितीवरच कोरडा
By admin | Updated: July 20, 2014 00:22 IST