अहमदनगर : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने नगर दक्षिण जिल्ह्यातील भाजपा पोरकी झाली आहे. मुंडे समर्थकांचा आधार हरवला आहे. सोबतच अनोखे राजकीय प्रयोग राबविणार्या मुंडेंची जिल्ह्यातील सर्वच पक्षातील नेत्यांना उणीव भासणार आहे. नवी समीकरणे तयार करून प्रस्थापितांना धक्का देणारे ‘मुंडे तंत्र’ आगामी काळात असणार नाही. भाजपासह अन्य पक्षातील उपेक्षित नेतेही अस्वस्थ झाले आहेत.जिल्ह्याच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे यांचा पहिल्यापासूनच प्रभाव राहिला आहे. उत्तरेमध्ये भाजपाचा फारसा प्रभाव नाही. माजी प्रदेशाध्यक्ष दिवंगत सूर्यभान वहाडणे आणि संगमनेरचे राधावल्लभ कासट हे नेते सोडले तर पक्षाचे उत्तरेत फारसे अस्तित्त्व नाही. श्रीरामपूरमध्ये प्रकाश चित्ते यांनी भाजपाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मुंडे यांच्यासारखा पाठीराखा नसल्याची जाणीव चित्ते यांच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना आहे. भाजपाचा प्रभाव हा दक्षिणेतच आहे. एक खासदार, दोन आमदार पक्षाला आहेत. खासदार दिलीप गांधी हे तसे गडकरी समर्थक आहेत. गांधी यांच्या एकाही सभेला मुंडे आले नव्हते. ते येऊ नयेत म्हणून पक्षातून मोठे प्रयत्न झाले. आमदार शिवाजी कर्डिले हे मुळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे. मात्र मतदारसंघाची फेररचना बदलल्यानंतर कर्डिले यांना भाजपात आणून त्यांना तिकीट देण्यापासून ते निवडून आणेपर्यंत मुंडे यांनीच जबाबदारी घेतली होती. त्यामुळे आगामी काळात कर्डिले यांच्या राजकारणात मुंडे यांची पोकळी जाणवणार आहे. प्रस्थापितांना शह देण्यासाठी मुंडे यांनाही कर्डिले यांच्या रुपाने ताकदवान विरोधक लाभला. प्रा. राम शिंदेही मुंडे समर्थक आहेत. ओबीसींचे नेतृत्त्व म्हणून मुंडे यांना वंजारी समाजाइतकाच धनगर समाजही प्रिय होता. त्यामुळेच प्रा. शिंदे यांना मोठे बळ लाभले. शिंदे यांची राज्य कार्यकारिणीवर निवड होणे, हे त्याचेच द्योतक आहे. ‘माझा गॉडफादर गेला’ ही शिंदे यांची भावना यासाठी बोलकी ठरावी. राहुरीचे चंद्रशेखर कदम हे तसे गडकरी-मुंडे या दोघांचेही समर्थक आहेत. मात्र जिल्ह्यातील राजकारणात तडजोडीच्यावेळी मुंडे हेच सर्वात आधी धावून यायचे. त्यांचे नसणे कदम यांनाही धोक्याचे आहे. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. प्रताप ढाकणे हे मुंडे यांच्या सांगण्यावरूनच राष्ट्रवादीत गेल्याची चर्चा झाली होती. ढाकणे यांचे नेतृत्त्व मुंडे यांच्या आशीर्वादामुळेच बहरले होते. आता ढाकणे यांचा राजकीय गुरूच काळाच्या पडद्याआड गेल्याने राष्ट्रवादीत असले तरी ढाकणे खर्या अर्थाने पोरके झाले आहेत. भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांच्याही राजकारणाला मुंडे यांचे पाठबळ होते. आगरकर यांचे उठणे-बसणे गडकरी यांच्यापेक्षा मुंडे यांच्याच जवळचे होते. त्यामुळे आगामी काळात आगरकर यांच्या प्रभावाला धक्का बसणार का, याकडेही भाजपातील वर्तुळाचे लक्ष असेल. (प्रतिनिधी)स्वपक्षात दुखावले गेले की त्यांना मुंडे आठवतात, असे काही नेते जिल्ह्यात आहेत. मग तो पक्ष भाजपा असो की काँग्रेस-राष्ट्रवादी! दक्षिणेतील नेते रामदास धुमाळ, राजीव राजळे, शिवाजीराव नागवडे, राजेंद्र नागवडे, अण्णासाहेब शेलार, विठ्ठल लंघे,शिवाजी काकडे यांनाही मुंडे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. अगदी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ वाटले की बबनराव पाचपुते यांनाही कधी कधी मुंडे यांची आठवण यायची. वारकरी म्हणून पर्यायी पक्ष म्हणून त्यांना भाजपा हाच सर्वात जवळचा पक्ष. म्हणूनच नगरच्या राजकारणाला कलाटणी देणारे नेते म्हणून मुंडे यांची छाप होती. साखर सम्राटांशीही मुंडे यांचे जवळचे संबंध होते. त्याचा वापर ते खुबीने राजकीय समीकरणे बांधण्यासाठी करून घ्यायचे. म्हणून त्यांच्या काँग्रेसमध्ये येण्याच्या अफवांनीही नेत्यांच्या उरात धडकी भरली होती. यापुढील नगरच्या राजकीय वळणांना मुंडे यांची उणीव जाणवणार, हे मात्र निश्चित!
नव्या समीकरणांची शक्यता धूसर
By admin | Updated: June 6, 2014 01:00 IST