अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्याच्या राजकारणात रोज नव्या घडामोडीची भर पडत आहे. मित्रपक्षांमध्ये एकमेकांच्या जागा खेचून घेण्याच्या राजकारणाने रंग भरलेला असताना पक्षांतर्गत राजकारण ‘संधीसाधू विरुद्ध निष्ठावंत’ आणि ‘स्थानिक विरुद्ध बाहेर’चे अशा वादाने तापले आहे. आज दिवसभरात श्रीगोंदा, पाथर्डी-शेवगाव आणि नगर शहर मतदारसंघावरुन हालचाली झाल्या. मुंबईत काँग्रेसच्या प्रदेश कमेटीसमोर शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांनी ‘बाहेर’च्या उमेदवाराविरुद्ध आपली भूमिका कायम असल्याचे दाखवून दिले तर पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात भाजपा निष्ठावंतांच्या गटाने आ.पंकजा मुंडे यांची भेट घेवून ऐनवेळी उमेदवारीसाठी ‘आयात’ उमेदवाराला तीव्र विरोध नोंदविला. तिच गत श्रीगोंदा मतदारसंघाची. नगर तालुका सेनेने आ. बबनराव पाचपुते यांचा संभाव्य भाजपा प्रवेश आणि उमेदवारीला काल आक्षेप घेतला होता. आज भाजपासह महायुतीने तर थेट बंडाची भाषा केली. पाचपुते यांना भाजपा प्रवेश व उमेदवारी दिल्यास निष्ठावंतांची आघाडी उभारुन उमेदवारी करण्याची घोषणाच पत्रपरिषदेत करण्यात आली. आ. शिवाजीराव कर्डीले यांचे समर्थकही या पत्रपरिषदेला उपस्थित असल्याने या विरोधाची धार तीव्र असल्याचे समोर आले. निष्ठावंतांचे बंडाचे निशानअहमदनगर : आ.बबनराव पाचपुते यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशाला नगर तालुक्यातून जोरदार विरोध वाढत असून, आज तालुक्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी पाचपुतेंना भाजपामध्ये प्रवेश दिल्यास त्यांच्या विरोधात उघड प्रचार करू. वेळप्रसंगी नगर-श्रीगोंदा मतदारसंघातील निष्ठावंतांची आघाडी करून सक्षम उमेदवार देऊ, असा इशारा देऊन पाचपुतेंविरोधात बंडाचे निशान फडकावले. नगर तालुका शिवसेनेच्या पाठोपाठ आज नगर तालुक्यातील भाजपा, शिवसेना व रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी आ.शिवाजी कर्डिले समर्थक ही उपस्थित होते. यात नगर बाजार समितीचे सभापती हरिभाऊ कर्डिले, भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद दळवी, माजी तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, नगरसेवक सुवेंद्र गांधी, सेनेचे तालुका प्रमुख संदेश कार्ले, जि.प. सदस्य बापू सदाफुले, रिपब्लिकनचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत ठोंबे आदी उपस्थित होते. यावेळी हे पदाधिकारी म्हणाले की, राज्यात महायुतीची सत्ता येणार असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीमधील नेत्यांच्या महायुतीत प्रवेश करण्यासाठी रांगा लागल्या आहेत. पाचपुते ही रांगेत उभे आहेत. पण १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी ‘आयाराम-गयारामांना’ उमेदवारी देऊन निष्ठावंतांना डावलल्याने युतीची सत्ता गेली. तीच परिस्थिती आता होऊ नये म्हणून महायुतीच्या निष्ठावंतांना डावलून पाचपुते यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली. ते म्हणाले की, ज्यांनी श्रीगोंदा मतदारसंघात निकृष्ट दर्जाचे कामे केली आणि मतदारांची नाराजी ओढावून घेतली ते पाचपुते आम्ही महायुतीत खपवून घेणार नाहीत. पाचपुते यांनी जनहिताच्या प्रश्नाला बगल देऊन नेहमीच सेना-भाजपाच्या विरोधात भूमिका घेतली. ज्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत त्या पाचपुतेंना घेऊन आम्ही कधीच मतदारांसमोर जाणार नाहीत. श्रेष्ठींना आमचा विरोध डावलून पाचपुतेंना भाजपामध्ये प्रवेश देऊन उमेदवारी दिली तर आम्ही महायुतीचे दोन्हीही तालुक्यातील निष्ठावंत एकत्र येऊन पाचपुतेंचा ‘कार्यक्रम’ करू. त्यांचा उघडपणे विरोधात प्रचार करू. वेळ प्रसंगी दोन्हीही तालुक्यातील निष्ठावंतांची आघाडी करून पापचुतेंसमोर सक्षम उमेदवार देऊ. पाचपुते यांना पक्ष व चिन्ह बदलण्याची सवय आहे. पक्ष बदलण्याचीही त्यांची सहावी वेळ आहे. जे कुठल्याच पक्षाशी व नेत्याशी एकनिष्ठ राहू शकत नाहीत ते महायुतीशी काय एकनिष्ठ राहणार. यामुळे पक्षाने उमेदवारी दिली तरी आमचा विरोध कायम राहील, असे या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी रमेश पिंपळे, अनिल करांडे, अंबादास बेरड, संजय कदम, बाबासाहेब खर्से, संजय जगताप, पोपट निमसे, बाजीराव हजारे, अभिलाष घिगे आदी उपस्थित होते. पाथर्डीत निष्ठावंतांची एकीशेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची उमेदवारी निष्ठावंत कार्यकर्त्याना देण्यात यावी, कोणत्याही परिस्थितीत बाहेरच्या उमेदवाराला पक्षाची उमेदवारी देवू नये यासाठी मतदारसंघातील भाजपाच्या सुमारे २० इच्छुक उमेदवारांनी एकी केली आहे. इच्छुकांच्या शिष्टमंडाळाने मंगळवारी भाजपाच्या नेत्या आ. पंकजा मुंडे यांची औरंगाबाद येथे भेट घेतली. तुम्ही एकदिलाने काम करा मला शेवगाव-पाथर्डीचा आमदार भाजपाचा पाहिजे. यासाठी निकषात जो बसेल त्याला उमेदवारी दिली जाईल. बाहेरच्याचा विचार केला जाणार नाही, असा शब्द आ.मुंडे यांनी दिल्याचा दावा या निष्ठावंतांनी केला. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा मोनिका राजळे व माजी सनदी अधिकारी सी. डी. फकीर यांच्या भारतीय जनता पक्षाच्या संभाव्य उमेदवारीची शक्यता गृहीत धरून या इच्छुक उमेदवारांनी थेट पंकजा मुंडे यांची भेट घेतल्याचे चर्चा सुरु झाली आहे. बुधवारी दुपारी शासकीय विश्रामगृहावर इच्छुक उमेदवार ज्येष्ठ नेते अशोकराव गर्जे, माजी आ. दगडू पा. बडे, माजी सभापती संपत कीर्तणे, अशोक चोरमले, बाबासाहेब ढाकणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अशोक गर्जे म्हणाले, आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या, आम्ही सर्व एक आहोत. आतापर्यंत आम्ही निष्ठेने पक्षाचे काम केले असून तुम्ही कोणालाही उमेदवारी द्या. आम्ही त्यासाठी जीवाचे रान करू व भाजपाचा उमेदवार विजयी करू, असे सांगितले. यावेळी बोलताना संपत कीर्तणे म्हणाले, निष्ठावंतांनाच उमेदवारी दिली पाहिजे व तसा शब्द पंकजा मुंडे यांनी दिला आहे. माजी सनदी अधिकारी हे पक्षाचे क्रियाशील सदस्य नाहीत, तसेच त्यांचे मतदारसंघात कोणतेही काम नाही. पक्षासाठी त्यांचे योगदान काय, असा प्रश्न कीर्तणे यांनी उपस्थित केला. यावेळी माजी आ. दगडू पा. बडे, अशोक चोरमले, बाबासाहेब ढाकणे यांनी सुद्धा निष्ठावंतांनाच उमेदवारी मिळेल, असा आशावाद व्यक्त केला. प्रदेश समितीसमोर नगरचा वाद कायम!अहमदनगर: नगर शहर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी स्थानिकालाच मिळावी अशी भूमिका शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांनी प्रदेश समितीसमोर मांडली. त्यांच्या या भूमिकेमुळे शहर मतदारसंघात युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन सुरु असलेला वाद शमलेला नसल्याचे समोर आले. आगामी विधानसभा निवडणुकीतील संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खासदार अशोक चव्हाण यांच्यासह प्रदेश समिती सदस्यांसमोर मुंबईत बुधवारी घेण्यात आल्या. जिल्ह्णातील कॉँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील हेही मुलाखतीदरम्यान उपस्थित होते. नगर शहर मतदारसंघातून शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा, नगरसेवक दीप चव्हाण, महिला शहर जिल्हाध्यक्ष सविता मोरे, सुभाष गुंदेचा, विनायक देशमुख व उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी उमेदवारी अर्ज जिल्हा कॉँग्रेस कमिटीकडे भरले होते. यातील कोतकर वगळता अन्य पाचजण मुलाखतीसाठी मुंबईत उपस्थित होते. संगमनेरचे सत्यजित तांबे हेही मुंबईतील या मुलाखतीला उपस्थित होते. त्यांनी थेट प्रदेश समितीकडेच उमेदवारी अर्ज दाखल केला होता. इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्रदेश समितीकडे पाठविताना शहर जिल्हा कॉँग्रेस कमिटीने ठराव केला होता. त्यात मतदारसंघाबाहेरील उमेदवार न देता स्थानिकालाच उमेदवारी द्यावी, असे म्हटले होते. त्याचा उल्लेख करत शहर जिल्हाध्यक्ष सारडा यांनी प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांच्यासमोर बाहेरच्या उमेदवारीला स्पष्ट विरोध दर्शविला. शहरातील स्थानिकालाच उमेदवारी द्यावी. सहा जणांनी अर्ज दाखल केले असून त्यांच्यापैंकीच एकाला उमेदवारी द्या. बाहेरच्याची उमेदवारी सहन होणार नाही. अन्यथा पराभव होईल, अशी भूमिका सारडा यांनी मांडली. शहर मतदारसंघातील विद्यमान युतीच्या आमदारांचे उणे-दुणे बाजूही प्रदेश समितीसमोर मांडण्यात आली. युवक काँग्रेसचा नगरवर दावाजिल्हा परिषद सदस्य सत्यजित तांबे हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे मजबूत नेते आहे. यामुळे अखिल भारतीय काँग्रेसने त्यांच्यासाठी अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली आहे. यामुळे या मतदारसंघातून तांंबे हाच पर्याय असल्याचा दावा अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सरचिटणीस व राज्याचे प्रभारी हिम्मतसिंह यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. त्यांच्या या दाव्यामुळे काँग्रेसकडून उमेदवारीवरून सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईत काँग्रेसकडून उमेदवारीसाठी सुरू असलेल्या मुलाखतीनंतर हिम्मतसिंह दूरध्वनीवरुन बोलत होते. काँग्रेसपक्षात एका विशिष्ट प्रक्रिेयेतून उमदेवारीवारी निश्चित केली जाते. तांबे युवक काँग्रेसमधील सक्रिय नेते आहेत. त्यांच्यासाठी प्रदेश युवक काँग्रेसने पक्षश्रेष्ठीकडे नगर शहरातून विधानसभेची उमेदवारी मागितली आहे. युवक काँग्रेसची ही मागणी शंभर टक्के मान्य होणार असून त्यांच्याशिवाय पर्याय नसल्याच्या विश्वास हिम्मतसिंग यांनी व्यक्त केला. देर आए दुरुस्त आएमंगळवारच्या पत्रकार परिषदेत फक्त नगर तालुका शिवसेनेने आपली भूमिका सपष्ट केली होती. आज नगर तालुका भाजपा व आ.शिवाजी कर्डिले यांच्या समर्थकांनी पाचपुते यांच्या भाजपा प्रवेशास उघड विरोध करून बंडाचे निशान फडकवल्याने भाजपाच्या भूमिकेबाबत ‘देर सेआए दुरुस्त आए’ अशी प्रतिक्रिया शिवसेना गोटात उमटली.
‘बाहेर’च्यावरुन राजकारण तापले!
By admin | Updated: August 20, 2014 23:31 IST