अहमदनगर : नगर-पुणे महामार्गावरील अपघातग्रस्त दोन वाहनात अडकलेल्या सात जणांना महामार्ग पोलिसांनी मृत्युंजय दूताच्या मदतीने तत्काळ सुरक्षित बाहेर काढून रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचा जीव वाचला.
नगर-पुणे महामार्गावरील हॉटेल कामरगाव परिसरात ८ जुलै रोजी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास कारचालकाचा ताबा सुटल्याने कार दुभाजकावर आदळून समोरून येणाऱ्या बोलेरो गाडीला जाऊन धडकली. या दोन्ही वाहनांतील एकूण आठ जण गंभीर जखमी झाले होते. याबाबत कामरगाव येथील मृत्युंजय दूत सिद्धांत आंधळे यांना घटना समजली तेव्हा ते तत्काळ अपघातस्थळी दाखल झाले. आंधळे यांनी अपघाताची माहिती महामार्ग पोलिसांना कळविली. काळी मिनिटातच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्त वाहनांतून आठ जणांना बाहेर काढले. यापैकी एकाचा मृत्यू झाला. मात्र वेळेत उपचार मिळाल्याने सात जणांचे प्राण वाचले. अपघातग्रस्तांना तत्काळ मदत केल्याबद्दल महामार्ग पोलिसांच्यावतीने मृत्युंजय दूत आंधळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महामार्ग पोलीस विभागातील सहायक निरीक्षक शशिकांत गिरी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
फोटो १३ सत्कार
फोटो - अपघातग्रस्तांना तत्काळ मदत केल्याबद्दल महामार्ग पोलिसांच्या वतीने मृत्युंजय दूत सिद्धांत आंधळे यांचा सहाय्यक पोेलीस निरीक्षक शशिकांत गिरी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.