अहमदनगर : कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आणि त्यातच न्युमोनिया, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आदी आजार असणाऱ्या रुग्णांना मृत्यूचा धोका अधिक असल्याचे तज्ज्ञांच्या पाहणीत आढळून आले आहे. अहमदनगर जिल्ह्यात मार्च आणि एप्रिल महिन्यातच सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. मात्र, कोणत्याही साथीच्या आजाराने मृत्यू झाला तर त्याच्यावर त्याच आजाराचे शिक्कामोर्तब होत असल्याने इतर आजारही कोरोनाच्या मागे लपले असल्याचे दिसते आहे.
जिल्ह्यात गतवर्षी १२ मार्च २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर जून महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूचा आकडाही वाढला होता. त्यानंतर मात्र कोरोनाचा आलेख खाली आल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला होता. मात्र, हा दिलासा अल्पायुषी ठरला असून, फेब्रुवारी २०२१पासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मार्च महिन्यापासून मृतांचा आकडाही वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नेमके कोणत्या कारणाने मृत्यू होत आहेत, यामागील कारणे तज्ज्ञांकडून जाणून घेतली असता, त्यामध्ये न्युमोनिया, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आदी आजार असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्याचे दिसून येते. जवळपास ८० ते ९० टक्के मृत्यू झालेल्या रुग्णांना न्युमोनिया, मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी, हृदयविकार आदी आजार असल्याचे समोर आले आहे. कोरोनाशिवाय अन्य कोणताही आजार नसलेल्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, न्युमोनिया, हृदयविकार, किडनी आदी आजार असलेल्या रुग्णांनी घराबाहेर न पडणे, कुणाच्याही संपर्कात न येणे, नियमित औषधोपचार घेणे, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केले जात आहे.
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात मृतांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. नगरच्या अमरधाम स्मशानभूमीत रोज ४० ते ५० जणांवर अंत्यसंस्कार होत आहेत. तसेच बरे झालेल्या रुग्णांची संख्याही ८५ टक्के आहे. आजाराचे वेळीच निदान व उपचार मिळाले तर रुग्ण या आजारातून बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसताच तातडीने कोरोना चाचणी करावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
-------------
अतिजोखमीच्या व्यक्तींनी काय करावे?
कोरोना काळात प्रत्येक व्यक्तीने आरोग्याप्रति जागरूक राहणे ही काळाची गरज ठरत आहे. विशेषत: न्युमोनिया, उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनी, हृदयविकार आदी आजार असलेल्या रुग्णांनी घराबाहेर न पडता, आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांनी इतरांच्या संपर्कात येऊ नये. घरात वयोवृद्ध आई-वडील, व्याधीग्रस्त नागरिक असतील तर युवकांनीदेखील आपल्यापासून घरातील ज्येष्ठांना कोरोना संसर्ग होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे.
-----------
जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या एप्रिलमध्ये वाढली आहे. मृत्यूचे डेथ ॲनॅलिलिस केले जाते. त्यानुसार कोणत्या कारणाने मृत्यू झाला, हे पाहिले जाते. सध्याची कोरोनाची स्थिती अत्यंत काळजी करण्यासारखी आहे. मात्र, असा डेथ ॲनॅलिलिस काढल्यानंतरच खरे मृत्यू कशामुळे झाले, हे कळू शकणार आहे. आधीचे आजार आणि त्यात कोरोना झालेला असताना मृत्यू झाला तर सध्या कोरोनानेच रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद केली जाते.
- डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा शल्य चिकित्सक
---
चार महिन्यांतील मृत्यू
जानेवारी - २०२१ - ५१
फेब्रुवारी - २०२१ - १२४
मार्च - २०२१ - ११९
एप्रिल - २०२१ - ७०१
एकूण - ९९५
---
डमी- नेट फोटो
२७ डेथ ऑर्डर
डेथ
डेथ (७)
----