अहमदनगर : कोरोनाच्या काळात उपयुक्त ठरणाऱ्या खपली गव्हाचे उत्पादन वांबोरी परिसरात तीन शेतकरी गटांनी सुरू केले असून, त्यांना प्रोत्साहन देत कृषी विभागाने तेथे विकेल ते पिकेल अभियान सुरू केले आहे.
कोरोनाच्या काळात या गव्हास मोठी मागणी वाढली आहे. खपली गहू ग्लुटेन फ्री असल्याने मधुमेह, हृदयविकार, आतड्यांचे कर्करोग, बद्धकोष्ठता, उच्च रक्तदाब, हाडांचे आजार यावर बहुगुणी असल्याने वैद्यकीय अधिकारी या गव्हाचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे वांबोरी येथील प्रगतिशील शेतकरी सतीश पाटील यांनी प्रादेशिक संशोधन केंद्र वेलिंग्टन (निलगिरी, तमिळनाडू) येथे संशोधित केलेल्या खपली गव्हाचे वाण निवडून मागील चार वर्षांपासून ते यशस्वी उत्पादन घेत आहेत. त्यांच्या पुढाकाराने वांबोरी पंचक्रोशीतील भागीरथ जवरे, श्याम हुलुळे, सुनील शेजवळ, नानासाहेब पटारे, योगेश वेताळ, दारासिंग कुसमुडे, भानुदास कुसमुडे, वसंत कुसमुडे, भाऊराव सोमवंशी, कारभारी हुलुळे, आप्पासाहेब गायगाय, मच्छिंद्र रहाणे, विकास पाटील, सतीश कुऱ्हे, संदीप शेजवळ, अशोक कुसमुडे, ज्ञानदेव कुसमुडे, अनिता पठारे, संगीता चिंधे, मीना पाटील, रोहिणी कुसमुडे, आशा पठारे आणि इतर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आत्माअंतर्गत तीन शेतकरी गटांची नोंदणी केली आहे. अहमदनगर आत्मा प्रकल्पाचे प्रकल्प संचालक शिवाजी जगताप, अनिल गवळी यांनी नुकतीच गटातील शेतकऱ्यांची भेट घेऊन खपली गव्हाविषयी चर्चा केली. वरिष्ठांनी या गटांची निवड करून ५० पीक प्रात्यक्षिकाचे नियोजन केले. शिवाय खपली गव्हाचे जोमदार उत्पादन घेऊन विकेल ते पिकेल या शासनाच्या अभियानास जोमाने सुरुवात केली.
------------
खपली गव्हास प्रतिक्विंटल पाच हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळत आहे. आरोग्यास फायदेशीर असलेला हा दुर्मीळ गहू उपलब्ध झाल्याने ग्राहक समाधानी आहेत. या पिकामुळे शासनाचे विकेल ते पिकेल हे अभियान यशस्वी होत आहे.
- सतीश पाटील, शेतकरी, वांबोरी