पिंपळगाव माळवी : शेतकरी, शेतमजुरांचे शेतकाम करताना कायमच फिजिकल डिस्टन्स असते. मेंढपाळांना मुक्या प्राण्यांसाठी दिवसभर रानोमाळ भटकंती करावी लागते. त्यामुळे आम्ही तर नेहमीच एकांतातच असतो. त्यामुळे आम्ही कोरोनापासून दूर आहोत, अशी भावना नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी पंचक्रोशीतील मेंढपाळ, शेतमजुरांनी व्यक्त केली.
मागील एक वर्षापासून जगभरात कोरोना महामारीने धुमाकूळ घातला आहे. याचा परिणाम ग्रामीण भागातील जीवनावरही झाला आहे. ग्रामीण भागातही कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने शासन नियम पाळण्याचे आवाहन करत आहे. त्याला प्रतिसादही मिळत आहे. पिंपळगाव माळवी परिसरातील बरेचसे युवक वेगवेगळ्या वाहनांवर चालक म्हणून काम करतात. परंतु, सध्या लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार बंद झाला. त्यामुळे त्यातील बरेचसे युवक शेतामध्ये कांदा काढण्याचे काम करत आहेत. शेतात मजुरी करताना हे मजूर मास्क व फिजिकल ‘ड’ नियमित वापर व सोशल डिस्टन्स पाळतात.
सध्या राज्यात सर्वत्र लोक डाऊन आहे. परंतु, आम्हाला आमच्या मेंढ्यांसाठी दिवसभर भटकंती करावीच लागते. या व्यवसायातून आम्हाला आर्थिक स्थैर्य मिळते, असे मेंढपाळ बाळासाहेब भोसले यांनी सांगितले.
लॉकडाऊनमुळे माझी चालकाची नोकरी गेली. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मी शेतात कांदे काढण्याचे काम करत आहे, असे वाहनचालक बाबासाहेब पवार यांनी सांगितले.
---
१५ पिंपळगाव माळवी
लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेले युवक शेतात कांदे काढण्याचे काम करत आहेत. शेतात फिजिकल डिस्टन्सचे पालन केले जात आहे.