श्रीगोंदा : भेसळयुक्त पेट्रोल विकले जात असल्याची खबर मिळताच श्रीगोंद्याचे तहसीलदार डॉ़ विनोद भामरे यांनी पेट्रोल पंपावर छापा टाकला़ या छाप्यात एक टँकर ताब्यात घेतला असून, या टँकरमधील पेट्रोल भेसळयुक्त आहे की नाही, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे़ मात्र, टँकरमधील पेट्रोलला रॉकेलचा वास येत असून, घनता योग्य असल्याचे निदर्शनास आले आहे़ त्यामुळे प्रशासन चक्रावले आहे़याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रमा पेट्रोल पंपावर भेसळयुक्त पेट्रोलची विक्री केली जात आहे, अशी खबर तहसीलदार डॉ.भामरे यांना मिळाली. तहसीलदार डॉ. भामरे यांनी बुधवारी (दि़१६) ४ वाजण्याच्या सुमारास चंद्रमा पेट्रोल पंपावर छापा टाकला़ या पेट्रोल पंपावर उभा असलेला एक पेट्रोलचा टँकर (एमएच-१६ एई-६६२२) तहसीलदारांनी तपासणीसाठी ताब्यात घेतला़ पेट्रोल हातावर घेतले असता पेट्रोलला रॉकेलचा वास येत होता परंतु पेट्रोलची घनता तपासली असता पेट्रोलचे मानांकन बरोबर निघाले़ त्यामुळे प्रशासन चक्रावले आहे़ या टँकरमधील पेट्रोलचा नमुना प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे़ तपासणीचा अहवाल आल्यानंतरच पेट्रोलमध्ये भेसळ आहे की, नाही हे सिद्ध होईल. तालुक्यात विविध कंपन्यांचे २० ते २५ पेट्रोल पंप सुरु आहेत. कोणत्याही पंपावरील पेट्रोल व डिझेलची गुणवत्ता तसेच वजन वेळेवर तपासले जात नाही़ त्यामुळे काही पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेलमध्ये भेसळ तर काही पेट्रोल पंपावर वजनमापात पाप केले जात आहे. तहसीलदार डॉ. भामरे यांनी एक पथक नेमून सर्व पेट्रोल पंपाची तपासणी करावी, अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
पेट्रोलमध्ये भेसळ?
By admin | Updated: July 17, 2014 00:32 IST