जामखेड : तालुक्यातील पिंपरखेड, हसनाबाद परिसरात मागील महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. पाणी असूनही शेतीतील पिकांना पाणी देता येत नाही. तसेच सिंगल फेजची वीज १२ ते १४ तास येत नाही. याबाबत महावितरण सातत्याने दुर्लक्ष करीत असून, येत्या आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न केल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा पंचायत समितीचे माजी उपसभापती अंकुशराव ढवळे यांनी दिला आहे.
ढवळे म्हणाले, यावर्षी चांगला पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर रब्बी पिके शेतकऱ्यांनी घेतली आहे. अरणगाव फिडरमधून पिंपरखेड व हसनाबाद तसेच परिसरात वीजपुरवठा होतो. परंतु, महिनाभरापासून विजेचा लपंडाव चालू आहे. त्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. वीज मिळते तीन ते चार तास मिळते. परंतु, त्यामध्ये भरणे होत नाही. दिवसा वीज असेल तर ती कमी दाबाने असते. त्यामुळे ती वारंवार जाते.
रब्बी ज्वारीला पाण्याची गरज असूनही ते वेळेवर मिळत नाही. सध्या ज्वारीचे दाणे भरत आले आहेत. तसेच गव्हाला ओंब्या येत आहेत. अशावेळी पाण्याची आवश्यकता आहे. परंतु पुरेशा दाबाने वीज नसल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. त्यामुळे आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन छेडू, असा इशारा ढवळे यांनी दिला आहे.