पाथर्डी : दलित, आदिवासी, भटके विमुक्त व अल्पसंख्यांक समाजाच्यावतीने शुक्रवारी सकाळी पाथर्डी तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसंदर्भात दणका मोर्चा नेण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी दिलेल्या घोषणांमुळे तहसील परिसर दणाणून गेला होता. आंंबेडकर पुतळ्यापासून सवाद्य काढण्यात आलेला मोर्चा तहसील कार्यालयावर गेल्यानंतर तो तहसीलच्या गेटवर पोलिसांनी अडविला. त्यानंतर येथे निषेध सभा घेण्यात आली. यावेळी टायगर फोर्सचे राज्य प्रवक्ते प्रा.किसन चव्हाण म्हणाले, दलित, आदिवासी समाजावर वर्षानुवर्षे अन्याय होत आहे. ज्या समाजासाठी दलित वस्ती योजना आहे त्याचा फायदा समाजाला होत नाही. दारिद्र्यरेषेत धनदांडग्याची नावे येतात, परंतु खरे गरजू वंचित रहातात. शासकीय अधिकाऱ्यांकडूनही दलितांना सापत्न वागणूक मिळते. यापुढे दलित आदिवासी, भटके विमुक्त व अल्पसंख्याकांना सन्मानाची वागणूक न मिळाल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशारा दिला. दलितांवर अन्याय करणाऱ्या गावगुंडाचा बंदोबस्त करावा, दलितांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, ख्रिस्ती समाजाच्या जमिनीत अतिक्रमण करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करावा. यापुढे दलित भटके अदिवासी समाजावर अन्याय झाल्यास तहसील कार्यालय आवारात जागा पुरणार नाही एवढा भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.अंकुश कांबळे यांचेही भाषण झाले. मोर्चेकऱ्यांच्यावतीने नायब तहसीलदार जगदीश गाडे यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात टायगर फोर्सचे राज्य प्रवक्ते प्रा.किसन चव्हाण, अंकुश कांबळे, भोरू म्हस्के, बाबा राजगुरू, रवींद्र आरोळे, संजय शिरसाट, शैलेंद्र बोंदाडे, अंबादास नवगिरे तसेच दलित बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)
पाथर्डीत दणका मोर्चा
By admin | Updated: August 23, 2014 00:43 IST