अहमदनगर: पालकमंत्री मधुकरराव पिचड यांच्यावर नाराजी व्यक्त करत आ़ बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला़ पाचपुते यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगून त्यांच्याविषयी आपण एकही अपशब्द वापरला नसल्याचे पिचड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले़नगर येथील पोलीस मैदानावर पालकमंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले़ त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ पिचड म्हणाले, माझे सहकारी बबनराव पाचपुते यांनी दूरध्वनीवरून शिव्या दिल्याचा आरोप केलेला आहे़ या आरोपात काहीही तथ्य नाही़ मी पाचपुते यांना फोन केला नाही़ त्यांनी फोन केला असता मी त्यांना विचारले की, आपणही आदिवासी खात्याचे मंत्री राहिलेले आहात़ त्यामुळे आपल्याला आदिवासींच्या जीवनाची सर्व माहिती असताना तुम्ही हा पाठिंबा कसा काय दिला़? तुम्ही हा पाठिंबा देऊन आदिवासी जनतेची घोर प्रतारणा केली, असे तुम्हाला वाटत नाही का? हे मी त्यांना बोललो़ कारण आदिवासी जमातीतील माणसं सुसंस्कृत आहेत़ खोटे बोलणे, चोरी करणे, ही आदिवासी जमातीची वैशिष्टे नाहीत, असे पिचड म्हणाले़