अहमदनगर : अहमदनगर महापालिका कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन व अनुदानाची रक्कम येत्या दोन दिवसात बँक खात्यात जमा करण्याच्या प्रशासनाच्या आश्वासानंतर कामगार संघटनेने आंदोलन स्थगित केले.
कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत कामगार संघटना व उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्यात बैठक झाली. या बैठकीस संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सचिव आनंदराव वायकर, बलराज गायकवाड, विठ्ठल उमाप, अकील सय्यद, गुलाब गाडे, मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर, आस्थापना विभागप्रमुख अशोक साबळे, घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. अशोक शेडाळे आदी उपस्थित होते. यावेळी सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाचे दोन हप्ते तातडीने कामगारांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावेत. कोरोनाबाधित कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना शहरातील प्रत्येक रुग्णालयात दोन बेड आरक्षित ठेवण्याची मागणी संघटनेने केली. याबाबत आयुक्त निर्णय जाहीर करतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्हा प्रशासनाला मिळणाऱ्या रेमडेसिविरचा १० टक्के साठा कर्मचाऱ्यांसाठी राखीव करण्यात यावा, या मागणीबाबत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्याचे ठरले. राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिकेतील कार्यालयीन कर्मचाऱ्यातील केवळ १५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्यात आली आहे. कायम मानधनावरील व कंत्राटी कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.