शिर्डी : शैक्षणिक व शेती विषयक दाखल्यांचा हंगाम सुरू असतानाही तालुक्यातील अनेक तलाठ्यांनी बुधवारी कामाला दांडी मारली़ राहाता तालुक्यातील दहा तलाठी कार्यालयांना दुपारी अकरा ते बारा या वेळेत भेट दिली असता चार तलाठी अनुपस्थित आढळले़ यातील अवघे दोघे अधिकृत रजेवर होते़तालुक्यात एकोणतीस तलाठ्यांची पदे आहेत़ यातील तीन पदे रिक्त आहेत़ तर शिर्डीचे सहाय्यक तलाठी पद अनेक वर्षांपासून भरलेलेच नाही़ तालुक्यातील लोकमत चमूने शिर्डी, राहाता, कोल्हार, भगवतीपूर, लोणी, बाभळेश्वर, अस्तगाव, सावळेविहीर, रुई, निघोज-निमगाव व नांदुर्खी येथील तलाठी कार्यालयांचा दुपारी आढावा घेतला़एरवी बराच वेळ व्हीआयपींच्या तैनातीत राहणारे शिर्डीचे तलाठी मांढरे बाहेरगावी होते़ त्यांच्या अनुपस्थितीत व्हीआयपींची गैरसोय टाळण्यासाठी निघोज-निमगावचे तलाठी आपला सजा सोडून व्हीआयपींच्या सेवेसाठी शिर्डीत होते़ त्यांनी दुपारपर्यंत वेगवेगळ्या चार व्हीआयपींना दर्शन घडवले होते़ शिर्डीच्या तलाठी कार्यालयात असलेले मंडल अधिकारी दिवटे मात्र आपल्या कामात कार्यमग्न होते़ तर सावळेविहीर, रुईच्या तलाठ्यांची आपल्या सजावर उपस्थिती होती़ नांदुर्खीच्या महिला तलाठीही विवाह सोहळ्यासाठी गेल्याचे समजले मात्र अधिकृत माहिती मिळू शकली नाही़भगवतीपूरच्या तलाठी प्रियंका डोळस यांचा विवाह असल्याने त्या अधिकृतपणे रजेवर होत्या़ तर कोल्हार बु़च्या तलाठी कार्यालयाला टाळे होते़ येथील तलाठी डोळस यांच्या विवाहासाठी नगरला गेल्याचे सांगण्यात आले़ बाभळेश्वर येथील तलाठी आपल्या दोन मदतनीसांसह कार्यालयात उपस्थित होते़ यावेळी एका उताऱ्यासाठी पंधरा रुपये आकारण्यात येत होते़ लोणीत एस़बी़ शिंदे, तर राहात्यात जाधव हे आपल्या कार्यालयात व्यस्त होते़ शैक्षणिक दाखल्यांबरोबरच गारपीट अनुदान, पीक विमा यांसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती़ बहुतेकांना अर्ज ठेऊन घेऊन दुपारनंतर बोलावण्यात येत होते़अस्तगावमध्ये मात्र सकाळी साडेआठपासून नागरिक तलाठी कार्यालयासमोर भाऊसाहेबांची प्रतीक्षा करत होते़ यात दोन महिलांच्या पतींचे निधन झाल्याने त्या आठ महिन्यांपासून नोंद लावण्याच्या कामासाठी हेलपाटे मारत असल्याचे समोर आले़ यातील एकीची नोंद लावली मात्र नावावर क्षेत्रच नाही, तर दुसरीच्या नावावर गारपीट अनुदान व विम्याचे पैसे आले, मात्र उतारा तिच्या नावावर नसल्याने पैसे मिळत नाहीत़ भाऊसाहेबांनी सकाळी बोलावल्याने कार्यालयासमोर अनेकजण बसून होते़ याबाबत तलाठी वाघ यांच्याशी लोकमत बातमीदाराने संपर्क केला असता आपण काल सायंकाळी उशिरापर्यत काम केले होते, आज बाहेरगावी आहे, उद्या कोर्टात काम आहे, परवा या असे सांगितले़ बाहेरगावी म्हणजे कुठे अशी चौकशी केली असता, अहवाल द्यायला तहसील कार्यालयात आल्याचे त्यांनी सांगितले. कोणता अहवाल असे विचारले असता, तुम्हाला काय करायचे त्याचे असा सवालही त्यांनी उपस्थित केला़दरम्यान, तालुक्यातील शिर्डी, भगवतीपूर व पुणतांबे येथील तलाठी अधिकृत रजेवर असल्याचे, तसेच तहसील कार्यालयात तलाठ्यांची कोणतीही बैठक नसल्याचे नायब तहसीलदार कोताडे यांनी लोकमतला सांगितले़भाऊसाहेबांपेक्षा ‘डमी’चा तोरा भारी..पाथर्डी: मोहटा , करोडी , चिंचपूर व पिंपळगांव टप्पा गावासाठी पाथर्डीच्या नाथनगर भागात तलाठी कार्यालय आहे. अकरा वाजले तरीही तलाठी कार्यालय उघडलेलेच नव्हते. चारही गावातून आलेले ग्रामस्थ व महिला तलाठी साहेबांची वाट पहात थांबले होते.कोणाला उतारे घ्यायचे होते व कोणाचे पीक विम्याचे काम होते.दोन ते तीन दिवसापासून चकरा मारूनही उतारे मिळत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.दुपारी दोन वाजेपर्यत तलाठी आले नव्हते.फोन लावला तर फोन उचलत नव्हते अशा उपस्थित ग्रामस्थांनी तक्रारी केल्या.भिलवडे व जांभळी गावासाठी पाथर्डीत असलेल्या तलाठी कार्यालयात साडेअकरा वाजेपर्यंत भाऊसाहेबच आलेले नव्हते. त्यांचा सहाय्यक कामकाज करीत होते.एक तासाने या एवढेच उत्तर उपस्थित ग्रामस्थांना तो देत होता. तलाठ्यापेक्षा सहाय्यकाचा रूबाब मोठा अशी तक्रार ग्रामस्थांनी केली.दैत्यनांदूर, सोनोशी, तोंडोळी, कळसपिप्री, साकेगांव , काळेगाव फकीर गावासाठी एकच तलाठी असल्याचे समोर आले. कोरडगाव येथे असलेल्या या सजेतील भाऊसाहेब दैत्य नांदूर येथे शासकीय कामासाठी गेले होते.शिराळ येथील तलाठी कार्यालय बंद होते. महिना महिना तलाठी गावात येत नसल्याची तक्रार ग्रामस्थांची केली. करंजी गावातील तलाठी कार्यालयास कुलूप लावलेले होते. हनुमानटाकळी , जवखेडे दुमाला व कोपरे येथील तलाठी सजा ग्रामपंचायत कार्यालयात असून तेथील तलाठीही दुपारी बारापर्यंत आलेले नव्हते. तिसगाव , शिरापूर , करडवाडी सजेतील तलाठीही जागेवर नव्हते . त्यांचा मदतनीस काम करीत होता. शेतकऱ्यांची गर्दी होती. कासारपिंपळगाव , जवखेडे खालसा, कासारवाडी येथील सजेत शेतकरी साडेअकरा वाजेपर्यंत तलाठ्याची वाट पाहत बसलेले होते. फोन लावला असता तलाठी साहेबांचा फोन बंद होता. त्यांचा सहाय्यक काम सजेचा कारभार सांभाळत होता. पाथर्डी तालुक्यातील भाऊसाहेब सजेच्या ठिकाणी नसतात. त्यांचे डमीच सजेचा कारभार पाहत असल्याचे वास्तव या स्टींगमध्ये दिसून आले. भाऊसाहेब कधी वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी कथन केल्या.
खासगी कामासाठी भाऊसाहेब कार्यक्षेत्राबाहेर
By admin | Updated: July 3, 2014 00:59 IST