चंद्रकांत गायकवाड
तीसगाव : अनधिकृत वैद्यकीय प्रयोगशाळा चालवून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या या मुन्नाभाईंवर थेट कारवाई करण्याचे आदेश पॅरावैद्यक परिषदेने बजावले आहेत. यासंबंधीचे पत्र नुकतेच प्रशासनाला प्राप्त झाले असून, जिल्हाधिकारी, आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाने थेट कारवाई करावी, असे या पत्रात म्हटले आहे.
अनधिकृत प्रयोगशाळांबाबत ‘लोकमत’ने सातत्याने आवाज उठविला होता. ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांबाबत पॅरावैद्यक परिषदेसमोर चर्चा झाली. त्यानंतर परिषदेने १० मे रोजी जिल्हा प्रशासनाला आदेश बजावले आहेत. नोंदणीच्या अटी व शर्ती अत्यंत जाचक आहेत. त्यामुळे नोंदणी न करताच पाथर्डी तालुक्यात अनेक जण विनापरवाना प्रयोगशाळा चालवून लोकांच्या आरोग्याची तपासणी करीत असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते. परिषदेचे पत्र प्राप्त होताच तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना केल्याचे सांगण्यात येते.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान दराडे म्हणाले, तक्रार दाखल झाल्यानुसार तालुक्याच्या विविध भागांतील सुमारे २० प्रयोगशाळा चालकांना नोटिसा बजावल्या जातील. एकतर पॅरावैद्यक नियामवलीनुसार नोंदणी करा, नाहीतर प्रयोगशाळा बंद करा. रुग्णांच्या जिवाशी खेळ खपवून घेतला जाणार नाही. थेट कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
.........................
काय होऊ शकते कारवाई
पॅरावैद्यक नियमावलींचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस तीन वर्षे कारावास व जास्तीत जास्त दहा हजारांचा दंड होऊ शकतो. वारंवार असे करताना आढळल्यास दहा वर्षेपर्यंत कारावास अन् २५ हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे, तसेच हे गुन्हे अजामीनपात्र असल्याचे सदर आदेशात बजावले गेले आहे.