अहमदनगर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे कार्यक्षेत्र राज्य करण्याबाबत पोटनियम दुरूस्तीचा विषय वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर शिफारशीकरिता ठेवण्यापूर्वी संचालक बोर्डाच्या मिटिंगमध्ये रोहोकले यांना मानणाऱ्या सातही संचालकांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेत कार्यक्षेत्र वाढीच्या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली होती. त्याचवेळी आम्ही सर्वांनी या विषयाला आमचा लेखी विरोध नोंदवा, अशी मागणी केली आहे. त्याबाबतचे लेखी म्हणणे आम्ही बोर्डात मांडले आहे, असे संचालक अविनाश निंभोरे यांनी सांगितले.
शिक्षक बँकेची १०० टक्के वसुली हीच सर्वात महत्त्वाची बाजू असून, कार्यक्षेत्र विस्तारामुळे कर्जाच्या वसुलीचा प्रश्न बिकट होणार आहे. राज्यक्षेत्र विस्तारामुळे राज्यात वाटलेल्या कर्जाची हमी कोण घेणार? कार्यक्षेत्र विस्ताराबाबत कोणतीही नियमावली केलेली नाही. या निर्णयाचे फायदे, तोटे याबाबत कसलीही चर्चा न करता हा विषय सर्वसाधारण सभेसमोर आणून जर तसा ठराव मंजूर केलाच, तर बँकेचे या निर्णयामुळे पुरते वाटोळे होऊन बँक डबघाईला येऊ शकते. म्हणून संचालक बोर्डात जरी बहुमताच्या जोरावर आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. तरी बँकेचे हित लक्षात घेऊन आम्ही या निर्णयाविरोधात उपनिबंधक यांना लेखी निवेदन देऊन विरोध नोंदविला आहे, असे निंभोरे म्हणाले.
सर्वसाधारण सभेत हा विषय निश्चितपणे मागे घेतला जाईल, असा विश्वास राजू मुंगसे, नाना बडाख, दिलीप औताडे, सीमा क्षीरसागर, मंजुषा नरवडे, संतोष अकोलकर यांनी व्यक्त केला. निवेदन देताना जिल्हा शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे व गुरुमाऊलीचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे उपस्थित होते.
............
२३ ठुबे
शिक्षक बँकेच्या कार्यक्षेत्र विस्ताराला विरोध असल्याचे निवेदन देताना प्रवीण ठुबे, अविनाश निंभोरे, राजू मुंगसे, नाना बडाख आदी उपस्थित होते.