श्रीगोंदा : भाजपाची उमेदवारी मिळावी म्हणून आघाडीतील काही दिग्गज नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. यावेळी भाजपातील निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी अन्यथा विधानसभा निवडणुकीत वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा भाजपा-सेना नेत्यांनी दिला आहे.विधानसभा निवडणूक उमेदवारीवर चर्चा करण्यासाठी रविवारी श्रीगोंदा येथे भाजपा-सेना कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत भाजपा श्रेष्ठींनी राजेंद्र म्हस्के, सुवर्णा कोतकर, संतोष लगड, दादाराम ढवाण, दत्तात्रय हिरनावळे या पाच इच्छुक उमेदवारापैकी एकास यावेळी संधी द्यावी. तालुक्यात आघाडीतील प्रस्थापित मंडळींच्या विरोधात नाराजीचा सूर आहे. काही नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे तर काही सोडचिठ्ठी देऊन उमेदवारीसाठी भाजपात येणार आहेत. यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बाहेरील नेत्यांनी भाजपाची उमेदवारी घेऊन पराभव होताच निघून गेले. पुन्हा भाजपाच्या विरोधात भूमिका घेतली. आता पक्षश्रेष्ठींनी बाहेरील उमेदवार अथवा मित्र पक्षाला जागा सोडण्याची चूक करू नये. बैठकीला भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडीक, भाऊसाहेब गोरे, राजेंद्र म्हस्के, संतोष लगड, सुवर्णा कोतकर, नंदकुमार ताडे, दादाराम ढवाण, राजेंद्र झराड, दत्तात्रय हिरणावळे आदी उपस्थित होते. निष्ठावंतांच्या उमेदवारीसाठी गडकरींना भेटणारश्रीगोंद्याची जागा भाजपातील निष्ठावंत नेत्याला द्यावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी श्रीगोंद्यातील भाजपा सेनेचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत. रविवारी आ. राम शिंदे यांची भाजपाचे राजेंद्र म्हस्के, सुवर्णा पाचपुते, संतोष लगड, बाळासाहेब महाडीक यांनी भेट घेऊन उमेदवारीबाबत चर्चा केली.गडकरी-पाचपुते यांची आज पुण्यात भेटभाजपातील प्रवेशावर अंतिम चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व आ. बबनराव पाचपुते यांची सोमवारी पुण्यात बैठक होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समजली आहे. आ. पाचपुते यांनी राष्ट्रवादी सोडण्यासाठी भाजपा प्रवेशाबाबत गडकरी यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर पाचपुतेंनी पवार काका-पुतण्यांवर तोफ डागत राष्ट्रवादी सोडली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पुण्यात श्रीगोंद्यातील पाचपुते विरोधकांची बैठक घेऊन पाचपुते यांची नाकेबंदी करण्यासाठी मदतीचे सूतोवाच केले.कुकडीचे अध्यक्ष राहुल जगताप, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार हे नेते पूर्वीपासून उमेदवारीसाठी भाजपाच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. आ. पाचपुते यांनी गडकरी लाईन टाकली आहे. त्यामुळे भाजपात आता उमेदवारीसाठी स्पर्धा सुरू आहे. मात्र रासपाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी बाळासाहेब नाहाटांसाठी जोरदार फिल्डींग लावली. त्यामुळे महाआघाडीच्या तिकिटाची लढाई कोण जिंकतो याकडे लक्ष लागले आहे.
भाजपा निष्ठावंतांचा आयारामांना विरोध
By admin | Updated: August 17, 2014 23:20 IST