आढळगाव : धनदांडग्यांपेक्षा शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या चळवळीतील कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून मिळालेली संधी स्वागतार्ह आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी व्यक्त केले.
श्रीगोंदा तालुक्याचे सुपुत्र अनिल घनवट यांची स्वतंत्र भारत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आढळगाव ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने संघर्ष करणारे घनवट अभ्यासू नेते असल्यामुळेच देशपातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या अशा चळवळीतील कार्यकर्त्यास तालुक्यातील जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देण्याची गरज असल्याचे शेलार यावेळी म्हणाले.
भाजपचे बाळासाहेब महाडीक, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र म्हस्के, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ यांनीही घनवट यांचा गौरव केला. शेतकरी हितासाठी सातत्याने अभ्यासपूर्ण भूमिका मांडत राहिल्यामुळे कार्याची दखल देशपातळीवर घेतली गेल्याचे अनिल घनवट यांनी सांगितले. यावेळी नानासाहेब बोळगे, शरद गव्हाणे, शरद जमदाडे, विक्रम शेळके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. श्रीकांत ठवाळ यांनी आभार मानले.
170921\392020210917_091602.jpg
स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांचा सत्कार करताना उपस्थित ग्रामस्थ