अहमदनगर : पाठ्यपुस्तके न मिळाल्याने यंदा पुस्तकांविना ऑनलाईन शाळा भरली असून शाळा भरून महिना लोटला तरी विद्यार्थ्यांच्या हाती अद्याप पुस्तके पडलेली नाहीत.
दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी शासनाकडून दिली जाणारी मोफत पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना वाटली जातात. यंदा १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. परंतु महिना होऊनही ही पुस्तके विद्यार्थ्यांना मिळालेली नाहीत. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शासनाकडे नवीन २३ लाख पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्य शासनामार्फत जिल्हा परिषदेसह सर्व अनुदानित शाळांच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. शाळेच्या पहिल्याच दिवशी त्याचे वाटप होते. नगर जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंत ४ लाख ६३ हजार विद्यार्थी असून त्यांना २४ लाख २० हजार पाठ्यपुस्तकांची गरज आहे. मागील वर्षी कोरोनामुळे जूनअखेर ही पुस्तके वाटप करण्यात आली होती. यंदाही प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या नसल्या तरी ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. त्यामुळे मुलांना पुस्तकांचे वाटप होणार आहे. तत्पूर्वी शासनाने मागील वर्षीची पुस्तके विद्यार्थ्यांकडून गोळा करण्याचे सांगितले होते. नगर जिल्ह्यात १ लाख पुस्तके गोळा झाली. उर्वरित २३ लाख पुस्तकांची मागणी जिल्हा परिषदेकडून शासनाकडे करण्यात आली आहे. मात्र अकोले तालुका वगळता इतर पुस्तके अद्याप प्राप्त झालेली नाहीत.
----------------
जिल्हा परिषदेकडून शासनाकडे २३ लाख पुस्तकांची मागणी नोंदवली आहे. त्यातील अकोले तालुक्यासाठी पुस्तके आली आहेत. ती लवकरच विद्यार्थ्यांच्या हाती पडतील. पुरवठादाराकडून पुस्तके प्राप्त होताच इतर तालुक्यांनाही त्वरित पोहोच केले जातील.
- शिवाजी शिंदे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक
--------------
पाठ्यपुस्तके लाभार्थी विद्यार्थीसंख्या
पहिली ते पाचवी - २,७६,१७०
सहावी ते आठवी - १,८७,७९१
एकूण - ४,६३,९६१
--------------
४ टक्के पुस्तकेच आली परत
जिल्ह्यातील ४ लाख ६३ हजार विद्यार्थ्यांना मागील वर्षी शासनाकडून एकूण २४ लाख पुस्तकांचे वाटप केले होते. यंदा ती पुस्तके परत गोळा करण्याच्या शासनाच्या सूचना होत्या. परंतु २४ लाखांपैकी केवळ १ लाख म्हणजे ४ टक्केच पुस्तके गोळा होऊ शकली.
--------------
पुस्तके नाहीत अभ्यास कसा करणार?
मागील वर्षीची पुस्तके फाटली आहेत. यंदा ॲानलाईन शाळा सुरू होऊन एक महिना झाला तरी नवीन पुस्तके आली नाहीत. सध्या सेतू अभ्यासक्रमानुसार मागील वर्षीचीच उजळणी सुरू आहे.
- सूरज गागरे, विद्यार्थी
--------------
मागील वर्षीची पुस्तके जमा करण्याबाबत शिक्षकांनी सांगितले होते. त्यानुसार पुस्तके जमा केली. आता नवीन पुस्तके अद्याप मिळालेली नाहीत. शिक्षक ऑनलाईन अभ्यास देत आहेत, त्याचीच उजळणी सुरू आहे.
- विकास शिंदे, विद्यार्थी