परिषदेचे प्रदेश संघटनमंत्री अभिजित पाटील यांच्या उपस्थितीत संगमनेरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारतमाता आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. परिषदेच्या अंतर्गत सुरू असलेल्या ‘स्टुडंट फाॅर डेव्हलपमेंट’ या उपक्रमातून श्रीक्षेत्र खांडेश्वर परिसरातील कपालेश्वर डोंगरावर प्रत्येक कार्यकर्त्याने एक झाड लावून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. उत्तरनगर जिल्हाप्रमुख प्रा. अरुण लेले, शहरमंत्री प्रतीक पावडे आदी यावेळी उपस्थित होते.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांसमोर मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. राज्य सरकारच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसंदर्भात सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलन केली. उच्च शिक्षणमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. म्हणूनच शैक्षणिक शुल्काबाबत सरकारला निर्णय करणे भाग पडले. कोरोना संकटाचे भीषण वास्तव पाहता असंख्य विद्यार्थी आपले शैक्षणिक शुल्क भरू शकत नाही. त्यामुळे असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहाण्याची शक्यता गृहीत धरून राज्य सरकारने यावर्षीची शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे प्रदेश संघटनमंत्री पाटील यांनी सांगितले.