अहमदनगर : जुन्या प्रकरणांचा निकाल प्रलंबित असल्याने आजही जिल्हा ग्राहक न्याय मंचाच्या पोर्टलवर दीड हजार प्रकरणे प्रलंबित असल्याचे दिसते आहे. कोरोना काळात व्हॉर्च्युअल पद्धतीने कामकाज पूर्ण केले असल्याने नगरच्या न्याय मंचात सर्वाधिक प्रकरणे निकाली लागली आहेत, असा दावा प्रबंधकांनी केला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या जिल्हा ग्राहक न्याय मंचात मोठ्या प्रमाणावर तक्रारी येतात. या तक्रारींचा निकाल लागत नाही, अशा ग्राहकांच्या तक्रारी असतात. त्यामुळे ज्या ग्राहकाचे नुकसान झाले, त्या ग्राहकाला न्याय कधी मिळणार? याबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा ग्राहक न्याय मंचाच्या कामकाजाचा ‘लोकमत’ ने मंगळवारी आढावा घेतला. त्यामध्ये जुन्या प्रलंबित प्रकरणांची संख्या अधिक असल्याचे दिसते आहे. नव्याने दाखल झालेल्या प्रकरणांपैकी निकाली निघालेल्या प्रकरणांची संख्या केवळ ११. ९७ टक्केच आहे. एकूण प्रलंबित प्रकरणांच्या तुलनेत निकाली प्रकरणांची संख्या केवळ ४ टक्केच असल्याचे दिसते आहे. त्यामुळे निकालाची गती मंदावली असल्याचे दिसते आहे.
--------------
सन २०२० मधील कामकाज
जुनी प्रकरणे-१०५६
२०२० मध्ये दाखल-३५९
निकाली-४३
वर्षअखेर प्रलंबित-१३७१
----
सन २०२१ मधील कामकाज (दोन महिने)
जुनी प्रकरणे-१३७२
दोन महिन्यात दाखल-७०
निकाली- १४६ (जुने व नवे मिळून)
प्रलंबित प्रकरणे-१४४०
--------------
ऑनलाईन कामकाज कोरोना काळात व्हर्च्युअल पद्धतीने कामकाज करण्यात आले. हे कामकाज १ जूनपासून सुरू झाले होते. अनलॉक होताच पुन्हा जुलैपासून प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले. तसेच ग्राहकाला आता तक्रार करण्यासाठी मंचाकडे प्रत्यक्ष येण्याची गरज नाही. त्याला तक्रार करण्यासाठी ऑनलाईन सुविधा देण्यात आली आहे. सुनावणीसाठी त्याला मात्र प्रत्यक्ष हजर रहावे लागेल, असे मंचाच्या प्रबंधकांनी सांगितले.
----------
प्रलंबित प्रकरणांची संख्या जास्त दिसत असली तरी त्यामध्ये अडचणी खूप होत्या. ज्यांच्या विरुद्ध तक्रारी दाखल केल्या, त्या कंपनीची कार्यालये बऱ्याचवेळा परराज्यात असतात. त्यांना नोटीस पाठविल्यानंतर ३० दिवसांची मुदत दिली जाते. या काळात त्यांच्याकडून म्हणणे प्राप्त झाले नाही किंवा प्रत्यक्ष सुनावणीस हजर राहिले नाही तर एकतर्फी निकाल दिला जातो. मात्र प्रकरणे निकाली काढण्याचा वेग आता वाढविण्यात आला आहे.
-प्रबंधक, जिल्हा ग्राहक न्याय मंच
-
डमी- नेट फोटो
०३ कम्ल्टेंट बॉक्स
०२ ग्राहक मंच डमी