अहमदनगर: महापालिकेतील दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आयुक्त विजय कुलकर्णी यांनी बुधवारी काढले. प्रभाग अधिकाऱ्यांचाही त्यात समावेश आहे. सहाय्यक आयुक्तपदाचा प्रभारी कार्यभार अशोक साबळे यांना देण्यात आला आहे. बदल्या करताना आयुक्तांनी सेवा ज्येष्ठता यादी डावलून नियुक्ती दिल्याने अधिकाऱ्यांमध्ये नाराजीची भावना पसरली आहे. महापालिकेत सावेडी, माळीवाडा, झेंडीगेट, बुरूडगाव असे चार प्रभाग कार्यालय आहेत. सावेडी प्रभाग कार्यालयातील अधिकारी अंबादास सोनवणे यांची बदली पुन्हा अस्थापना विभागप्रमुख म्हणून केली असून त्यांच्या जागी शहाजहान तडवी यांची नियुक्ती केली आहे. माळीवाडा प्रभाग कार्यालयातील प्रमुख अशोक साबळे यांच्याकडे सहाय्यक आयुक्त पदाचा कार्यभार देण्यात आला असून त्यांच्या जागी स्थानिक संस्था कर विभागातील जितेंद्र सारसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. झेंडीगेट प्रभाग कार्यालयातील प्रमुख विनोद दिवाण यांची सहाय्यक करमूल्य निर्धारण अधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी प्रभाग चारचे रणदिवे यांची नियुक्ती केली आहे. मार्केट विभागातील नाना गोसावी यांची बुरूडगाव प्रभाग अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून मार्केट विभागाचा पदभार सुनील तांबोळी यांच्याकडे दिला आहे. आस्थापनाप्रमुख रमेश खोलम यांच्याकडे कामगार अधिकारी तसेच आकृतीबंध व आस्थापना विषय सेवाप्रवेश नियमाची जबाबदारी दिली आहे. रेकॉर्ड विभागप्रमुख सय्यद हाफीजोद्दीन यांच्याकडे हे पद कायम ठेवत जाहिरात कर, होर्डिंज, मोबाईल व टॉवर वसुलीचे अतिरिक्त कामकाज देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)वाद उफाळणार ? सहाय्यक आयुक्त संजीव परसरामी हे ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहे. त्यांचा पद्भार अशोक साबळे यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र साबळे यांच्यापेक्षा शहाजहान तडवी यांची सेवाज्येष्ठता अधिक आहे. याशिवाय कोणाची कुठे नियुक्ती करावी याबाबतची माहिती देणारा चार्ट आस्थापना प्रमुख रमेश खोलम यांनी आयुक्तांना दिला होता. मात्र आयुक्तांनी सेवाज्येष्ठता डावलून केल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे. आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या कारकिर्दीत प्रथमच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या त्याही वादातीत होण्याची शक्यता आहे.
अधिकाऱ्यांच्या बदल्या
By admin | Updated: July 31, 2014 00:40 IST