अहमदनगर : जिल्ह्यात गुरुवारी २४ तासात १३१९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सात हजार २०० इतकी झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९७ टक्के होते. वाढत्या रुग्णसंख्येमुळे हे प्रमाण घसरले असून, ते आता ९१ टक्क्यांवर आले आहे.
जिल्ह्यात गुरुवारी ८२९ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८७ हजार ८१९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.२५ टक्के इतके झाले आहे. गेल्या २४ तासात जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४४७, खासगी प्रयोगशाळेत ४०० आणि अँटिजेन चाचणीत ४७२ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर शहर (३६२), कोपरगाव (१४४), नेवासा (१००), श्रीरामपूर (९१), पाथर्डी (६५), संगमनेर (६४), अकोले (६३), राहाता (६३), नगर ग्रामीण (५८), शेवगाव (५३), राहुरी (५१), कर्जत (५०), भिंगार (३९), श्रीगोंदा (३४), जामखेड (३२), पारनेर (२८), परजिल्हा (१९), मिलिटरी हॉस्पिटल (२), परराज्य (१) येथील रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात गुरुवारी चार जणांचा मृत्यू झाला आहे. नगर शहरापाठोपाठ कोपरगाव, नेवासा, श्रीरामपूर, पाथर्डी, संगमनेर, राहाता, नगर, राहुरी, कर्जत या तालुक्यांमध्ये जास्त रुग्ण आढळून येत आहेत. यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्यावर भर दिला असून, तालुक्याच्या ठिकाणही कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्याचा आदेश दिला आहे.
----------------
कोरोनाची स्थिती
बरे झालेली रुग्णसंख्या : ८७,८१९
उपचार सुरू असलेले रुग्ण : ७२००
मृत्यू : १२२२
एकूण रुग्णसंख्या : ९६,२४१