मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूरमोदी सरकारने अच्छे दिन आणण्याच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात प्रायोगिक तत्वावर काही ठिकाणी १०० टक्के इथेनॉलवर बस व कार चालविल्या जाणार आहेत.महायुतीमधील घटक पक्ष स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी श्रीरामपूरमध्ये ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली. इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण १० टक्के केल्याने भारताचे इंधन खरेदीसाठी खर्ची पडणारे १ लाख ७२ हजार कोटी रूपयांचे परकीय चलन वाचणार असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची इथेनॉलबाबतची मागणी होती. पूर्वीच्या अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये राम नाईक केंद्रीय पेट्रोलियममंत्री असताना त्यांच्या कारकिर्दीत पेट्रोलमध्ये ५ टक्के इथेनॉल मिश्रणाचा निर्णय झाला. त्याचा देशभरातील साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला. नंतरच्या मनमोहनसिंग सरकारने हा निर्णय थांबविल्यानंतर देशभरातील इथेनॉल उद्योग संकटात सापडला. गडकरी केंद्रीय वाहतूक मंत्री झाल्यानंतर त्यांनी इंधन पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाचा निर्णय घेतला. त्यासोबतच प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रात नागपूरमध्ये १०० टक्के इथेनॉलवर बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय कारही चालविल्या जाणार आहेत. अशा बस व कार देशात बनवायच्या की परदेशातून आयात करायच्या, याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. इथेनॉलच्या मिश्रणाचे प्रमाण वाढविण्यासाठी कारखानदारांसोबतच आग्रह धरणारे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार शेट्टी यांनी नुकतीच केंद्रीयमंत्री गडकरी यांची भेट घेतली. या भेटीत गडकरी यांनी ही माहिती दिल्याचे ते म्हणाले.
आता इथेनॉलवर धावणार बस, कार
By admin | Updated: August 9, 2014 23:32 IST