त्यावेळी माझे मित्र व नगर महापालिकेचे तत्कालीन नगरसेवक संभाजी पवार यांनी माझी ओळख नीलेश लंके यांच्याशी करून दिली. ‘गवारे हे होतकरू आहेत. त्यांना बांधकाम व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यांना काही काम देता आले तर पहा’, अशी विनंती माझ्यासाठी पवार यांनी लंके यांना केली. त्यांनी मला दुसऱ्याच दिवशी सुपा येथील कार्यालयात बोलविले. ते त्यावेळी हंगा गावचे सरपंच होते व शिवसेनेचे तालुकाप्रमुख होते. त्याच काळात त्यांच्या पत्नी राणीताई या पंचायत समितीच्या सदस्य झाल्या.
मी गेलो तेव्हा ते कार्यकर्त्यांशी चर्चा करीत होते. थोडा वेळ बाहेर थांबल्यानंतर त्यांनी मला पाहिले व लगेच आत बोलावले. ‘आलास तू’ असे म्हणत स्वत:च्या डब्यात मला जेवू घातले. त्यानंतर मला विचारले ‘कुठले काम पाहिजे तुला’. त्यावर ‘बांधकामाशी संबंधित कुठलेही काम करण्याची माझी तयारी आहे. माझ्याकडे पदवी आहे’, असे मी सांगितल्यावर त्यांनी लगेच वाळवणे येथे त्यांचे मित्र सचिन पठारे यांना फोन करून मला त्या ग्रामपंचायतच्या रस्ता काँक्रिटीकरणाचे काम मिळवून दिले. मी ते काम दर्जेदारपणे पूर्ण केले. माझ्या आयुष्यातील हे पहिले काम होते व ती खूप मोठी संधी होती. पुढे त्यांनी आपल्या स्वत:च्या ग्रामपंचायत हद्दीतील एक काम मला दिले. यातून माझ्या व्यवसायाचा श्रीगणेशा झाला व मी स्थिरावत गेलो.
हे उदाहरण मी एवढ्यासाठी कथन केले आहे की मी लंके यांच्या नात्यातील नाही. गावचाही नाही. मी नेवासा तालुक्यातील. ते पारनेरचे. केवळ मित्रामुळे ओळख झाली व त्यांनी एवढा प्रचंड विश्वास माझ्यावर दाखविला. एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या मुलाला त्यांनी कंत्राटदार बनविले. माझ्या आयुष्यात एकप्रकारे मला ते ‘लढ’ म्हणाले. आज प्रगती करण्यासाठी तुमच्याकडे पदवी व कल्पकता तर हवीच. परंतु संधीही आवश्यक असते. अशी संधी तरुणांसाठी मोठे भांडवल असते. माझ्या आयुष्यात हे भांडवल मला लंके यांनी दिले.
नेता एखाद्या सर्वसामान्य तरुणाच्या जीवनात किती बदल घडवून आणू शकतो याचे उदाहरण म्हणून मी माझ्याकडे पाहतो. आमदार लंके यांच्याबाबतचे अनेक अनुभव अंगावर शहारे आणतात. हा माणूस आमदार होण्यापूर्वीपासून सतत जनतेत आहे. निवडणूक काळात ते जेव्हा गावोगाव फिरत होते तेव्हा काही मुले त्यांच्या खाऊचे पैसे वर्गणी म्हणून त्यांना देत होते. एखादी आजीबाई लुगड्यात गुंडाळून ठेवलेली दहा-वीस रुपयांची नोट त्यांच्या हातात द्यायची. हे चित्र सर्वांनी पाहिले. आमदार निवासात हा नेता स्वत: खाली लादीवर झोपतो व कार्यकर्त्यांना पलंगावर झोपण्याचा आग्रह करतो. आपला परिवाराकडे दुर्लक्ष करून, प्रसंगी स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून पहाटे दोन-दोन वाजतादेखील लोकांच्या मदतीला धावून जाताना त्यांना पाहिले आहे. कोरोनाकाळात सर्व नेतेही जेव्हा स्वत:ला जपत होते व जनतेत मिसळणे टाळत होते तेव्हा आमदार लंके हे प्रशासनाचा आदेश धुडकावून गोरगरिबांची मदत करीत होेते. हर्जुले हर्या येथे उभारलेले कोविड सेंटर हे त्याचे मोठे उदाहरण आहे. अनेक परप्रांतीय मजूर त्यावेळी अडकून पडले होते. वास्तविकत: हे मजूर त्यांचे मतदार नव्हते. मात्र या मजुरांसाठी त्यांनी अन्नछत्र उभारले. एवढेच नव्हे अनवाणी पायांनी चालणाऱ्या मजुरांना चपला दिल्या. विकासकामांसाठी दिल्ली, मुंबई या वाऱ्या तर त्यांच्या नियमित सुरू असतात.
राजकारण हे अंतिमत: समाजाच्या हितासाठी असते. पक्ष, सत्ता या सर्व बाबींचा उद्देश हा जनहित हाच आहे. लंके यांचे राजकारण हे ‘जनांचा आधारू’ या बाबीत मोडते. असे राजकारण हे समाजासाठी आधारस्तंभ बनते.
- सचिन गवारे,
स्थापत्य अभियंता