नेवासा : तालुक्यातील खडका व मुकिंदपूर शिवारातील गट नं. ११० व ११४ मध्ये त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान व साहेबराव हरिभाऊ घाडगे यांनी नैसर्गिक ओढा अनधिकृतपणे अडवून मोठमोठ्या यंत्राद्वारे बेकायदेशीररित्या बंधारा घालण्याचे काम सुरु केले आहे़ त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे दळणवळण बंद होऊन जमिनी पडीक पडतील. त्यामुळे हे काम त्वरित बंद करुन हा ओढा पूर्ववत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे़मौजे खडका व मुकिंदपूर शिवारातील शेतकऱ्यांनी नेवाशाच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या परिसरातील गट नं. ११० व ११४ मध्ये त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान व साहेबराव घाडगे यांनी नैसर्गिक ओढा अनधिकृतपणे अडवून बंधारा घालण्याचे काम यंत्राच्या सहाय्याने सुरु केले आहे. या बंधाऱ्यामुळे ओढ्याकाठच्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून शेती नापिक होणार आहे. जमिनीत पाणी साचल्याने या जमिनीतील पिकांचे नुकसान होईल व या शेतकऱ्यांचा दळणवळणाचा मार्गही बंद होणार आहे. काही शेतकऱ्यांच्या जमिनीतील मातीही उचलली आहे. या बंधाऱ्याच्या भिंतीजवळ आजूबाजूला भरपूर लोकवस्ती असल्याने त्यांच्या जीवितास धोका होऊ शकतो. ओढा, नाला कोणत्याही संस्थेस किंवा खासगी इसमास अडविता येत नसताना सुद्धा हे काम सुरु आहे. हे संपूर्ण काम बेकायदेशीररित्या सुरु आहे़या बेकायदा खोदकामाची व बंधाऱ्याची पाहणी होऊन त्रिमूर्ती प्रतिष्ठान व घाडगे यांच्यावर त्वरित कारवाई करावी, खोदकाम व बांधकाम जमीनदोस्त करुन ओढा पूर्ववत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे़ त्रिमूर्ती प्रतिष्ठान व घाडगे यांच्यावर कारवाई न केल्यास उपोषणास बसण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे़ निवेदनावर शिवसेना जिल्हा नेते रामदास गोल्हार, बबन लोखंडे, दिगंबर निपुंगे, असलम इनामदार, विजय कोळेकर यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (तालुका प्रतिनिधी) हा बंधारा संस्थेच्या हद्दीत आहे़ बंधाऱ्यासाठी स्वत: खर्च करुन त्यासाठी शासनाची परवानगी घेतली आहे़ या ३५ एकरातील बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले असून, त्यात कुठल्याही शेतकऱ्याची जमीन पाण्यात जाणार नाही़ -साहेबराव घाडगे, त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान
नैसर्गिक ओढा बुजविला
By admin | Updated: July 15, 2014 00:47 IST