डॉ. दिघावकर हे मंगळवारी बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण हत्येप्रकरणी माहिती घेण्यासाठी येथे आले होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषेदत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपअधीक्षक संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके, निरीक्षक संजय सानप, मसूद खान उपस्थित होते.
प्रारंभी महानिरीक्षक डॉ. दिघावकर यांनी बेलापूर येथे जाऊन हिरण यांच्या दुकानाची व अपहरण घडलेल्या जागेची पाहणी केली. हिरण यांच्या मोबाईल प्रवास मार्गाने जाऊन आढावा घेतला. मृतदेह आढळलेल्या एमआयडीसी परिसरातही डॉ. दिघावकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. शहर पोलीस ठाण्यात सर्व पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
ते म्हणाले, ‘साक्षीदारांच्या माहितीवरून, शास्त्रीय व तांत्रिक पुरावे व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे सागर गंगावणे व बिट्टू ऊर्फ रावजी वायकर या दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलीस कोठडीत आरोपींकडून बरीच माहिती समोर येणार आहे. त्यानंतर हत्येचे मूळ कारण स्पष्ट होईल. तपासाची सर्व माहिती सार्वजनिक करता येणार नाही. त्यामुळे आरोपींना फायदा मिळू शकतो. लवकरात लवकर या प्रकरणाचा उलगडा करून सत्य जनतेसमोर आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.’
------
फोटो ओळी : ०९ प्रताप दीघावकर
येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर. समवेत जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील.