अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील हातगाव-कांबी येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल नाभिक समाजाच्यावतीने सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. साडेबारा वाजता हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.आरोपींना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, या खटल्यासाठी सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, पीडित कुटुंबांना आर्थिक मदत मिळावी, पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे, त्यांचे पुनर्वसन करावे, अशा मागण्या मोर्चेक-यांनी केल्या आहेत. या मागण्यांचे निवेदन थोड्याच वेळात जिल्हाधिका-यांना देण्यात येणार आहे. समाजाच्या पाच मुली हे निवेदन जिल्हाधिका-यांना देणार आहेत. समाजाचे कार्यकर्ते सुनील वाघमारे, संजय मदने, श्रीपाद वाघमारे, विशाल सैंदाणे, विकास मदने, अशोक औटी, योगेश पिंपळे, सदाभाऊ शिंदे, शरद दळवी, बाळासाहेब भुजबळ, शांताराम राऊत, माऊली गायकवाड आदींच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आहे.गांधी मैदान येथून या मोर्चाला प्रारंभ झाला़ राज्यभरातून सकल नाभिक समाज या मोर्चासाठी नगरमध्ये दाखल झाला आहे. अनेक वाहनांवर चलो नगर असे फलक लिहिलेली वाहने मोठ्या संख्येने नगरमध्ये दाखल झाली आहेत. त्यामुळे नगरमधील सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत.
नाभिक समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 14:08 IST