तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील सायखिंडी गावाच्या शिवारात धारदार हत्याराने डोक्यात व मानेवर वार करून एका युवकाचा खून करण्यात आला. सचिन अरविंद शिंदे (वय २८, रा. मोठेबाबा मळा, सायखिंडी शिवार) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. शनिवारी झालेल्या खुनाची ही घटना रविवारी उघडकीस आली.
मृत सचिन शिंदे यास शनिवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून घेऊन गेले होते. सायखिंडी शिवारातील सोमनाथ निवृत्ती पारधी यांच्या मालकीच्या सर्व्हे नंबर २३४ मधील शेतात सचिन शिंदे यास नेऊन धारदार हत्याराने त्याच्या मानेवर व डोक्यावर गंभीर वार करून तसेच त्याच्या डाव्या गुडघ्यास जखम करून शनिवारी रात्रीच्या सुमारास ठार मारले. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, डीवायएसपी राहुल मदने, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, सहायक पोलीस निरीक्षक आर. एस. सानप यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. याप्रकरणी मृताचे वडील अरविंद दामू शिंदे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात दोघा आरोपींविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक आर. एस. सानप या खुनाच्या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. खुनाच्या या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.